ताज्या बातम्यासामाजिक

अस्मिता लोकसंचलित साधन केंद्राची ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून

महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर (महाराष्ट्र शासन अंगीकृत) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान कक्ष माळशिरस स्थापित अस्मिता लोकसंचलीत साधन केंद्र, महाळूंग यांची ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री गणेश हॉल श्रीपूर येथे संपन्न झाली.

सदर सभेस महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे, सहा. जिल्हा समन्वय अधिकारी माविम, सोलापूर सतीश भारती, तालुका अभियान व्यवस्थापक रणजीत शेंडे, उमेश जाधव, तालुका उपजीविका सल्लागार तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाळुंग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी चव्हाण, उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील तसेच नगरसेविका सौ. तेजश्री लाटे, सौ. सविता रेडे पाटील, सौ. ज्योती रेडे पाटील, सौ. शारदा पाटील, संदीप मोटे व्यवस्थापक अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र, सौ. जयश्रीताई बाबर,(अध्यक्ष), सौ. ज्योती शिंदे, (सचिव) व लोक संचलीत साधन केंद्राच्या सर्व कार्यकारिणी सदस्या, सीआरपी केंद्राचे महिला सभासद उपस्थित होते.

या सभेची सुरूवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रमुख मान्यवर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. महिलांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या स्फूर्ती गीताचे गायन केले. यावेळी प्रमुख मान्यवरांचे स्वागत अस्मिता लोकसंचलित साधन केंद्राचे अध्यक्ष, सचिव व कार्यकारी मंडळ यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून करण्यात आले.

यावेळी संस्थेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत केलेल्या कामाचे अहवाल वाचन सीएमआरसी व्यवस्थापक संदीप मोटे यांनी केले. ८५ टक्के महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना विविध बँकांमार्फत वित्त पुरवठा करण्यात आला. महिलांकडून कर्जाची १००% परतफेड करून घेण्यात यश प्राप्त झाले व सर्व गट नियमित परतफेड करतात. अनेक महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये कापड दुकान व्यवसाय, किराणा दुकान, स्टेशनरी, हॉटेल, शिवणकाम असे व्यवसाय उभारणी केले आहेत.

तसेच लखन साठे सीएमआरसी लेखापाल यांनी संस्थेचा आर्थिक अहवाल वाचन केले‌. यात संस्थेकडे असणारी विविध उपक्रम निहाय खाती असून सर्व खात्याचा आर्थिक ताळेबंद सर्व सभासदासमोर मांडण्यात आला व त्यास मंजुरी घेण्यात आली. सर्व ताळेबंद चार्टर्ड अकाऊंटंट यांनी केलेल्या लेखापरीक्षण यानुसार मांडण्यात आला व सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील नियोजित खर्चास सर्वसाधारण समिती सदस्यांची मंजुरी घेण्यात आली. अमोल भोसले व्हिओ लेखापाल ग्रामसंघ यांनी सर्व ग्रामसंघाच्या आर्थिक बाबींचा सविस्तर अहवाल मांडला. रणजित शेंडे तालुका अभियान व्यवस्थापक माळशिरस यांनी तालुक्यातील कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यात तालुक्यात आवश्यक असणारी कामे यामध्ये कार्यकारी मंडळ यांनी संस्थेच्या कामात सक्रीय सहभाग घ्यावा व गावाच्या विकासाच्या दृष्टिने नवनवीन उपक्रम राबविण्यात यावेत, असे सागितले. सतिश भारती सहा. जिल्हा समन्वय अधिकारी, (माविम) यांनी मार्गदर्शन केले. त्यामधे सीएमआरसी ने प्रभाग संघात केलेल्या कामाचे कौतुक केले. सीएमआरसी प्रभागसंघात चालू केलेल्या आठवडी बाजाराचा खडतर प्रवास सांगितला व त्यातून एक नाविन्यपूर्ण बदल कशाप्रकारे झाला आहे. त्यानंतर जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी महिलांनी एक दिवस स्वतःसाठी कसा द्यावा, महिनाभराच्या कामातील एक दिवसाची पगार फक्त स्वतःसाठी आपल्याला बचत कशी करावी, तसेच घर दोघांचे अभियान तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, शेतकरी महिलांसाठी १ रु. नव्याने चालू झालेली प्रधान मंत्री पिक विमा योजना, वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या महिलाना ईएम लोनबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी वर्षभरात उत्कृष्ट कामगीरी करणार्या गटांना उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

गौरविण्यात आलेले स्वयंसहाय्यता महिला बचत गट पुढीलप्रमाणे – हाय लिंकेज १) रणरागिणी स्वयंसहायता महिला बचत गट, लवंग सेक्शन २) राजरत्न स्वयंसहायता महिला बचत गट, लवंग ३) आहिल्यादेवी स्वयंसहायता महिला बचत गट, गणेशगाव ४) श्री राम समर्थ स्वयंसहायता महिला बचत गट महाळुंग ५) गोपिका स्वयंसहायता महिला बचत गट, महाळुंग ६) आदर्श स्वयंसहायता महिला बचत गट, श्रीपूर ७) अहिल्याबाई स्वयंसहायता महिला बचत गट, महाळुंग
उत्कृष्ट परतफेड – १) तनिष्का स्वयंसहायता महिला बचत गट, उंबरे-वेळापूर,२) जिजामाता स्वयंसहायता महिला बचत गट, वाफेगाव,३) बिस्मिल्ला स्वयंसहायता महिला बचत गट, महाळुंग ४) गोदावरी स्वयंसहायता महिला बचत गट महाळुंग गट नं – २.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई बाबर यांनी अध्यक्षीय भाषण केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी गावडे व संदीप मोटे सीएमआरसी व्यवस्थापक यांनी केले. तर क्षेत्र समन्वयक सारिका माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button