श्रमसंस्कार शिबीरातून युवकांचे उज्वल भविष्य घडते. – जयसिंह मोहिते पाटील.
अकलूज (बारामती झटका)
मौजे चाकोरे येथे शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या समारोप प्रसंगी मोहिते पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अशा शिबीरातून युवकांचा व्यक्तीमत्वाचा विकास होतो. आज सर्वांना हक्काची जाणीव आहे, पण कर्तव्याची जाणीव नाही. आज सर्व शिबीरार्थींचा आत्मविश्वास वाढलेला आहे व कर्तव्याची जाणीवही झालेली आहे. अशा शिबिरातून युवकांचे उज्वल भविष्य घडते अशा शिबीरांची देशाला गरज आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे होते.
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे “युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास” विशेष श्रमसंस्कार सात दिवसीय शिबीर मौजे चाकोरे येथे संपन्न झाले. या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गावात ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण व वृक्षदिंडी, श्रमदानातून वनराई बंधारा बांधणे, चक्रेश्र्वर मंदिर, विठोबा पाटील, जि. प. शाळा, निरा नदी घाट परिसरात स्वच्छता व श्रमदान केले. तसेच गावातील भिंतीवरती व्यसनमुक्तीवर सुविचार लिहून प्रभातफेरी काढून जनजागृती केली. या दरम्यान महिला मेळावा, संमोहनशास्त्र, जादूचे प्रयोग, भारुड, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. या कालावधीत डॉ. विश्वनाथ आवड, डॉ. लक्ष्मण आसबे, प्रा. धनंजय देशमुख, जितेंद्र बाजारे, सुमित भोसले यांची वैचारिक व्याख्याने संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर चक्रेश्वर माध्यमिक विद्यालयाचे सभापती किसन भिताडे, शिवामृतचे संचालक हनुमंत शिंदे, युवानेते राहुल वाघमोडे, सहकार महर्षी सहकारी साखर कारखाना शंकरनगरचे संचालक लक्ष्मण शिंदे, सरपंच नवनाथ जाधव, उपसरपंच सचिन कचरे, चंद्रकांत शिंदे, सागर वरकड, डॉ. चंकेश्वर लोंढे, डॉ. बाळासाहेब मुळीक आदी उपस्थित होते.
यावेळी हितेश पुंज, स्नेहा मगर, किरण भांगे यांनी आपल्या मनोगतातून शिबीरातील आपले अनुभव व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. दत्तात्रय मगर यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार शिंदे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा. बलभीम काकुळे यांनी मानले. हे श्रमसंस्कार शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. सज्जन पवार, डॉ. सविता सातपुते यांनी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng