Uncategorized

जिद्द, चिकाटी व मेहनतीवर आई-वडिलांच्या आशीर्वादाने दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवला.

सौ.लक्ष्मीबाई व श्री. नारायण यांचा बापूराव पुत्र व्हावा ऐसा, त्याचा त्रिलोंकी झेंडा, प्रतिकूल परिस्थितीत कार्य कर्तुत्वावर गाठले यशाचे शिखर

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते येथील सर्वसामान्य आणि संस्कारीक सौ. लक्ष्मीबाई नारायण पांढरे व श्री. नारायण गणपत पांढरे यांचा नवसाचा पुत्र बापूराव उर्फ मामासाहेब यांनी प्रतिकूल परिस्थितीत कार्य कर्तुत्वावर यशाचे शिखर गाठलेले आहे. पुत्र व्हावा ऐसा, ज्याचा त्रिलोकी झेंडा, असे म्हटले जात आहे. कारण जिद्द, चिकाटी व मेहनतीवर आई-वडिलांच्या आशीर्वादाने दरिद्री संस्काराचा स्वर्ग बनवला. ज्या जागेमध्ये काडाच्या कुडाच्या घरात जन्म झाला, त्याच ठिकाणी राजमहालासारखा बंगला बांधून आई-वडिलांचे घराला नाव देऊन समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.

गणपत बापूराव पांढरे यांना पाच मुले, त्यापैकी नारायण आहेत. त्यांचा गोंदवले येथील वाघमोडेवाडी येथील लक्ष्मीबाई यांच्याशी 1967 साली विवाह झालेला होता. शेतकरी कुटुंब व परिस्थिती बेताची यामुळे नारायण यांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काबाड कष्ट करून आपल्या बायका मुलांचा उदरनिर्वाह सुरू होता. अनेक ठिकाणी शेतातील मिळेल ते काम इमाने इतबारे करून प्रपंचाचा गाडा सुरू होता. लक्ष्मीबाई आणि नारायण यांना चार मुली झालेल्या होत्या. लक्ष्मीबाई यांची मनोमन इच्छा होती, आपल्याला मुलगा हवा म्हणून. त्यांनी येताळ बाबाला नवस केलेला होता. लक्ष्मीबाई यांच्या बहिण आनंदीबाई वाघमोडे यांनीही कुळकजायचा खंडोबा त्याला नवस बोलल्यानंतर बापूराव यांचा जन्म झाला आहे. नारायण यांचे आजोबा पोटाला आलेले असल्याने बापूराव हे नाव ठेवलेले होते. मात्र लक्ष्मीबाई यांच्यासमोर मोठा पेच पडलेला होता. आजेसासरे जन्माला आलेले असल्याने बापूराव नावाने कशी हाक मारायची म्हणून त्यांनी मामासाहेब त्यांच्याकरिता नाव ठेवलेले होते.

पांढरे परिवार यांच्या घरामध्ये परिस्थिती बेताची असली तरीसुद्धा मनाची श्रीमंती मोठी होती. संसाराचा गाडा हाकत असताना प्रतिकूल परिस्थितीत लक्ष्मीबाई आपल्या संसाराला हातभार लावण्याकरता देशी गाय, म्हशी, शेळ्या, कोंबड्या असे पालन करून उत्पन्नाचे स्तोत्र निर्माण केलेले होते. पूर्वीच्या काळी सायकलवर दूध घेऊन जावे लागत होते. मामासाहेब यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोराटे वस्ती येथे शाळेत जाण्यास सुरुवात केली. शाळेमध्ये जात असताना दुधाची किटली घेऊन जावे लागत होती. वस्तीपासून डांबरी रस्ता दोन ते अडीच किलोमीटर होता. रस्त्यावर चिखल मातीचा सामना करून दररोज सायकलवर खडतर प्रवास करावा लागत होता. कसेबसे सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती अभावी पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असूनसुद्धा घेता आले नाही.
शाळा सोडल्यानंतर मामांच्या खांद्यावर प्रपंचाची धुरा आलेली होती‌ मामांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीवर आई-वडिलांनी आपल्यासाठी कष्ट केलेले पाहिलेले होते, त्यामुळे मामांनी नातेपुते येथे सुरुवातीस राजाभाऊ पांढरे यांच्या सहकार्याने कॅसेटचे दुकान सुरू केले होते. कार्यकर्तुत्व आणि मामांनी उद्योग व्यवसाय करत आपली आर्थिक प्रगती वाढवत नेली‌. समाजकारण व राजकारण सुरू केलेले होते.

मामासाहेब यांच्या जीवनामध्ये बरड येथील तात्याबा लकडे यांची कन्या भारती यांच्याशी 2002 साली विवाह होऊन लक्ष्मीच्या पावलाने घरामध्ये आलेल्या होत्या. मामांच्या आर्थिक प्रगतीला गती मिळालेली होती. मामासाहेब यांनी सुरुवातीचा राजकारणातील रस्ता बदलला आणि मामांचे राजकारण वेगळ्या वळणावर आलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांच्या राजकीय सहकार्याने राजकारण केले. नातेपुते नगरीचे माजी पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्र भाऊ पाटील यांच्या समाजकार्याचा आदर्श घेऊन समाजकार्य सुरू केले. ज्येष्ठ नेते रघुनाथ कवितके यांच्या उद्योग व व्यापाराचे अनुकरण करून उद्योग व्यवसायात गरुड भरारी घेतली. मामासाहेबांनी विजयदादांचे मार्गदर्शन, बाबाराजे, राजेंद्रभाऊ व कवितके अण्णा यांच्या सहकार्याने अनेक क्षेत्रात प्रगती करून दिवसेंदिवस चढता आलेख निर्माण केलेला आहे.

नातेपुते पंचक्रोशीमध्ये मामासाहेब नावाचे नवे वादळ सुरू झालेले होते. तरुणांचे संघटन, जेष्ठांचे मार्गदर्शन, समाजामध्ये आदर्श वागणूक यामुळे मामांना नातेपुते ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळालेली होती. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयदादा आणि बाबाराजे यांनी ग्रामपंचायत गटातून मामासाहेबांना उमेदवारी दिलेली होती. मामासाहेबांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये समाजकार्य व संघटन कौशल्यामधून निवडणुकीत चुणूक दाखवली आणि मामांना विजयदादांनी मोठ्या विश्वासाने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी विराजमान केले. तेव्हापासून मामासाहेब मोहिते पाटील परिवार व देशमुख परिवार यांचे विश्वासू घटक बनले. 2019 मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सौ. भारती पांढरे यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंतच्या ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये 1256 मतांनी विजय होण्याचा विक्रम केलेला आहे. घरामध्ये प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बरडच्या सुसंस्कृत लकडे घराण्यातील भारतीताई यांनी मामासाहेब यांना साथ देऊन राजकारणात जिल्ह्यात प्रथम येऊन मामांची उंची वाढविलेली आहे. नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर पहिल्या वेळेस नगरसेविका होण्याचा बहुमान सौ. भारती पांढरे उर्फ मामी यांना मिळालेला आहे.

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेता आले नाही मात्र, बाबाराजे देशमुख यांच्या सहकार्याने मामासाहेब यांना नातेपुते एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बाळकृष्ण दाते प्रशालेवर सभापती होण्याचा बहुमान मिळालेला आहे. मामांकडे अनेक राजकीय पदे आहेत. त्यांनी आपल्या पदाचा कायम सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी उपयोग केलेला आहे. गरीबी व प्रतिकूल परिस्थिती जवळून पाहिलेली असलेले मामा समाजामध्ये अनेक लोकांना अडचणीच्या काळात उपयोगी पडत आहे. परिस्थितीमुळे शिक्षण घेतले नाही मात्र, त्यांनी आपली मुले रघु व प्रकाश यांचे सीबीसी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण दिले आहे.

नातेपुतेकरांनी शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्काराचे आयोजन मामासाहेब पांढरे मित्र मंडळ, अतुल उद्योग समूह व मामाश्री प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आलेले होते. एकाच हारामध्ये मातोश्री सौ. लक्ष्मीबाई, पिताश्री नारायण, धर्मपत्नी सौ. भारतीताई चिरंजीव रघु व प्रकाश यांना एकाच हारामध्ये गुंफलेले होते. त्यावेळेस सर्वांच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या छटा उमटलेल्या होत्या. आई-वडील यांच्या चेहऱ्यावर आजपर्यंत आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले, धर्मपत्नी यांच्या चेहऱ्यावर लग्नापासून दिलेली साथ उपयोगी पडली, रघु आणि प्रकाश यांच्या चेहऱ्यावर उज्वल भविष्य दिसत होते. असे संपूर्ण पांढरे परिवार एकाच हारात मात्र आनंद वेगवेगळ्या डोळ्यांत पाहायला नातेपुतेकरांना मिळालेले होते.

बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी लक्ष्मी नारायण निवास, नातेपुते या ठिकाणी भेट घेऊन मातोश्री लक्ष्मीबाई, पिताश्री नारायण, धर्मपत्नी सौ. भारतीताई, चिरंजीव रघु व प्रकाश यांच्याशी हितगुज साधून मामासाहेब घडत असताना जीवनातील अनेक पैलूंचा उलगडा झालेला होता. आई-वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत मामांवर केलेले संस्कार, धर्म पत्नीने दिलेली साथ, यामुळे मामासाहेब यांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारा चढता आलेख राहणार आहे. अशा दिलदार व परम मित्रास बारामती झटका परिवार यांचेकडून 23 ऑगस्ट रोजीच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा‌. मामासाहेब आपणांस उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस साकडे आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button