Uncategorizedताज्या बातम्या

नालासाठी घोडा घेणारे सावंत कुटुंब असून टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे…

करमाळा (बारामती झटका)

आदिनाथ सहकारी साखर कारखाना यावर्षी पूर्ण सक्षमपणे चालवण्यासाठी लागणारी सर्व ताकद प्राध्यापक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत देणारा असून सावंत कुटुंबाबद्दल वल्गना करणाऱ्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन आदिनाथ कारखान्याचे प्रशासक महेश चिवटे, संजय गुटाळ यांनी केले आहे. प्रशासक पदी नेमणूक झाल्यानंतर आज प्रथमच संजय गुटाळ व महेश चिवटे यांनी आदिनाथ कारखान्यावर येऊन आढावा बैठक घेतली. यावेळी कार्यकारी संचालक अरुण यांनी स्वागत केले. तसेच उत्पादक सभासदांच्यावतीने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी नूतन प्रशासकांचे हार, फेटा, शाल देऊन स्वागत केले.

यावेळी आदिनाथ साखर कारखान्याला पाणीपुरवठा करणारी नवीन पाईपलाईन उभारणी करणे, त्यासाठी स्वतंत्र कारखान्याचीच वीज नेण्यासाठी यंत्रणा उभा करणे, ऊस वाहतूक करार करण्यासाठी नियोजन करणे, आदिनाथ कारखान्याच्या मशिनरीची मेंटनस दुरुस्तीसाठी खर्चाचा आढावा घेणे, कारखान्याची बाकी वसूल करण्यासाठी कडक धोरण करणे, कायदेशीर कारवाई करणे, कारखान्याचे पैसे बेकायदेशीर वापरणाऱ्या व्यक्तींचे नाव वृत्तपत्रातून प्रसिद्ध करणे, चोरी झालेल्या कारखान्याच्या परचेस ऑफिसमधील मालाची तपासणीसाठी पोलिसांकडे पाठपुरावा करणे यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पत्रकारांनी आदिनाथ कारखान्याकडे सावंत कुटुंबाची असलेली रक्कम वसूल करण्यासाठी तुमची प्रशासक पदी नेमणूक केली आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत आपले मत काय यावर बोलताना महेश चिवटे आणि गुटाळ म्हणाले की, जेव्हा आदिनाथ अडचणीत आला होता तेव्हा प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी स्वतःच्या खिशातील तेरा कोटी रुपयांची रक्कम दिली. यावेळी करमाळा तालुक्यातील पुढारी शेपूट घालून बसली होती. ज्यांनी ज्यांनी या आदिनाथच्या राजकारणातून पैसा सत्ता संपत्ती कमवली ते सुद्धा घरात बसले. शिवाय विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी सुद्धा कोणती आर्थिक मदत करण्याची भूमिका घेतली नाही, अशा परिस्थितीत तानाजी सावंत यांनी केलेली मदत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

प्राध्यापक सावंत यांना आपले पैसे काढून घ्यायचे असते तर यावर्षी चालू हंगामात साखर विक्री झाल्यानंतर आधी स्वतःचे पैसे काढून घेतले असते, पण तसे न करता प्राध्यापक सावंत व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पहिल्यांदा ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे सर्व पैसे देण्याचा निर्णय घेतला. कारखाना चालू करण्यासाठी प्राध्यापक आरोग्य मंत्री तानाजी सावंत मदत करणार आहेत. सावंत बंधू म्हणजे नालासाठी घोडा घेणारी माणस आहेत, त्यांचा करमाळ्यातील पुढार्‍यांच्या बगलबच्चांनी नाद करू नये व त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये. सी डी सी बँक दिल्ली बँकेचे कर्ज वन टाइम सेटलमेंट करून पूर्ण कारखान्याचे कर्ज नील करण्याची सुद्धा भूमिका सावंत कुटुंबाची आहे व नंतर एकाच बँकेचे इथेनॉल प्रकल्प सहित कारखान्याचे विस्तारीकरण दहा हजार टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे करणे असे स्वप्न सर्व तालुक्यातील सभासदांचे आहे.

आदिनाथ कारखाना सर्व सभासदांच्या, कर्मचाऱ्यांचा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. आम्ही याचे फक्त ट्रस्टी म्हणून कारभार करणार असून हे कामकाज करत असताना आदिनाथ कारखान्याचा चहा सुद्धा पिणार नाही, अशी भूमिका चिवटे व गुटाळ यांनी जाहीर केली.

आदिनाथ चा पैसा शापित पैसा!!

आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे रूपाने कमवलेला पैसा शापित पैसा असून यातून कोणालाही यश मिळत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. याची जाणीव प्रत्येक कारखान्यातील संचालक, सभासद, कर्मचाऱ्यांनी ठेवली पाहिजे, असे मत सभासदातून व्यक्त होत आहे. साखर विक्रीतून गतवर्षी पाच कोटी रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी न्यायालयाने राखून ठेवली आहे ही रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करून या रकमेतून सर्व कामगारांचे पगार करण्याचा संकल्प प्रशासक मंडळाचा असल्याचे गुटाळ व चिवटे यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button