बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि निबंधक इंदिरा अस्वार यांच्यावरील कारवाईसाठी गौतम भंडारे व सुनील ओवाळ यांचे २१ जूनपासून तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानावर उपोषण सुरू
मुंबई (बारामती झटका)
सनातनी महासंचालक सुनील वारे यांची बार्टीतून तात्काळ हकालपट्टी करावी आणि निबंधक इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी ८ जूनला बार्टीसमोर उपोषण केले होते. तेव्हा मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांनी याकडे दुर्लक्ष केले होते.
बार्टीच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार न रूजविता सनातनी विचारांचा प्रसार करणाऱ्या व मागासवर्गीयांच्या उन्नतीआड येऊन जाणीवपूर्वक आंबेडकरी चळवळीतील कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी यांना टार्गेट करणाऱ्या महासंचालक सुनील वारे यांची बार्टीतून हकालपट्टी करावी. तसेच तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी निबंधक इंदिरा अस्वार यांना माहिती अधिकार प्रकरणात खाडाखोड करणे, न्यायालयीन प्रकरणात दिशाभूल करणे, बार्टीला बदनाम करणे या विविध कारणांचा ठपका ठेवून पदमुक्त केले होते. तर त्यांची विभागीय चौकशी करण्याचे पत्र २३ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री व सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना पाठवले होते. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही.
इंदिरा अस्वार मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून येत असलेला कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित ठेवून मागासवर्गीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ध्येय व उद्दिष्टे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या बार्टी या संस्थेला बदनाम व निष्क्रीय करण्यासाठी त्या कुणाच्या इशाऱ्यावर बार्टीत आल्या आहेत? तसेच त्या बौध्द समतादूत, अधिकारी, कर्मचारी यांचा मानसिक छळ कुणाच्या इशाऱ्यावरून करतात?

तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी कार्यमुक्त केलेल्या धनश्री अवचरे यांना वादग्रस्त निबंधक इंदिरा अस्वार यांनी पुन्हा कामावर घेतल्याने त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच अस्वार या टेंडर निवड प्रक्रियेतसुध्दा हस्तक्षेप करीत आहेत व आपल्या लोकांना सोबत घेऊन त्यांना बार्टीच्या विरोधात आंदोलन करायला सांगत आहेत, असे समजते. त्यामुळे निबंधक इंदिरा अस्वार या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणांना हरताळ फासून मागासवर्गीयांच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या निबंधक इंदिरा अस्वार यांची शासनाने तात्काळ विभागीय चौकशी करण्याबरोबरच त्यांना निलंबित करावे. यापूर्वी या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन आपणास ८ जूनच्या उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार आम्ही उपोषण केले होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng