मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सायकल बँकेचे भरभरून कौतुक
ग्रामविकास विभाग सायकल बँक उपक्रम राज्यात राबवणार
सोलापूर (बारामती झटका)
जिल्हा परिषद सोलापूर मुलींसाठी सुरू केलेली सायकल बॅंक प्रेरणादायी आहे. ग्रामविकास विभाग मुलींसाठी सायकल बॅंक सुरू करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेणार, अशी माहिती ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात स्वच्छता दिंडीच्या समारोप समारंभासाठी आले असता पंढरपूर तालुक्यातील दहा मुलींना १० सायकलचे वाटप ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते करणेत आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा परिषदेचा सायकल बॅंकेसारखा नाविण्यपुर्ण उपक्रम राज्यास दिशा देणारा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाचा निधी न वापरता स्वत: लोकवर्गणी, अधिकारी, कर्मचारी व विविध संस्थांची मदत घेऊन जिल्ह्यात २,८८० सायकलींचे वाटप केले आहे. हा नाविण्यपुर्ण उपक्रम मुलींच्या शिक्षणासाठी दिशा दर्शक आहे. यामुळे शाळेपासून दूर राहत असलेल्या २,८८० मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. शिक्षणाच्या प्रवाहापासून मुली दूर राहणार नाहीत, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. सोलापूर जिल्हा परिषदेने सायकल बॅंकेचा उपक्रम राज्यातील मुलींसाठी कशा प्रकारे राबविता येईल याची काळजी ग्रामविकास विभाग घेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या उपक्रमाच्या सुरूवातीपासून ते आजतागायत सायकल बँकेबरोबर विविध उपक्रमांचा माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांना दिली. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील हा सायकल बॅंकेचा उपक्रम समजावून सांगितला. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी नाळे, विस्तार अधिकारी लवटे यांनी सायकल बँकेच्या वाटपासाठी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng