महिला तणावमुक्त असतील तरच, महिलांचे आरोग्य मजबूत राहील – प्रा. शिवाजीराव सावंत
करमाळा (बारामती झटका)
सुदृढ महिला, निरोगी महिला निर्माण करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माता सुरक्षित ते घर सुरक्षित योजना संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली जात असताना महाराष्ट्रातील संपूर्ण महिला तणावमुक्त राहिल्या पाहिजेत यासाठी, होम मिनिस्टरसारखे कार्यक्रम किंवा महिलांचे विविध स्पर्धा घेणे गरजेचे असून त्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या महिलांच्या स्पर्धा होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांना तणावमुक्त ठेवण्यासाठी यशस्वी ठरला आहे, असे मत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध महिलांच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले कि, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता पक्षाच्या माध्यमातून करमाळा तालुक्याचे सुपुत्र मंगेश चिवटे पूर्ण महाराष्ट्रात रुग्णांना मदत करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात अनेक आरोग्य शिबीर घेऊन रुग्णांना मदत करण्याचे काम बाळासाहेबांचे शिवसेनेचे कार्यकर्ते करत आहेत. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या कृतीतून शिवसैनिक करत आहेत. यापुढील काळात निश्चितच याचा फायदा राजकारणासाठी व समाजकारणासाठी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले की, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरोग्याच्या संदर्भात सतर्क असून महाराष्ट्रातील एकही रुग्ण मदतीशिवाय उपेक्षित राहिला नाही पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. गेल्या चार महिन्यात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जवळपास 30 कोटी रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्रातील रुग्णांना झाली आहे. जवळपास २५ हजार शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. या वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून हजारो आरोग्य शिबिरातून जवळपास ६५ कोटी रुपयांच्या औषधांचे वाटप करण्यात आले. यापुढील काळात प्रत्येकाने रोज एका रुग्णाला मदत करावी किंवा त्याला योग्य मार्गदर्शन करावे व ज्याला मदतीची गरज आहे त्यांचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता पक्षाची संपर्क घडवून द्यावा हे सुद्धा एक पुण्याचे काम आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी प्रा. शिवाजीराव सावंत यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, तालुकाप्रमुख देवानंद बागल, शहर प्रमुख संजय शीलवंत, उपशहर प्रमुख नागेश गुरु, महिला आघाडीचे अध्यक्षा प्रियंका गायकवाड, युवा सेनेचे निखिल चांदगुडे, सागर गायकवाड, राहुल कानगुडे, वैद्यकीय मदत पक्षाचे दीपक पाटणे, नागेश शेंडगे, रोहित वायबसे, जयराज चिवटे, आजिनाथ कोळेकर, निलेश चव्हाण, राजेंद्र मिरगळ, आजिनाथ इरकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng