ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करा, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विद्यापीठास भेट देऊन स्मारकाचा घेतला आढावा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ५० लाखांचा निधी जाहीर!

सोलापूर (बारामती झटका)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात निर्माण होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम दि. १५ जुलै २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याचबरोबर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी १ ऑगस्ट २०२५ रोजी स्मारक उद्घाटनाचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

शुक्रवारी, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कामाची पाहणी केली. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी पालकमंत्री गोरे यांचे स्वागत करून त्यांना स्मारक कामाची माहिती दिली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, सिनेट सदस्या तथा भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्मारक समितीचे सदस्य सर्वश्री माऊली हळणवर, शिवाजी कांबळे, शिवाजी बंडगर, अमोल कारंडे, सोमेश्वर क्षीरसागर, सुभाष मस्के, नागेश वाघमोडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी स्मारक व विद्यापीठाच्या विविध मागण्यासंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर केले. यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. निधीची कमतरता भासल्यास जिल्हा नियोजन समितीमधून त्यासंदर्भात तरतूद करू. दि. १५ जुलै पर्यंत काम पूर्ण करून १ ऑगस्ट २०२५ रोजी स्मारकाचे उद्घाटन करू, असेही ते यावेळी म्हणाले. विद्यापीठाच्या वनविभागाच्या आरक्षित जागेचा प्रश्न देखील मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी काढण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरात असलेल्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी देखील निश्चित मदत करू, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ५० लाखांचा निधी जाहीर…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्ष असून वर्षभर विद्यापीठाच्यावतीने जिल्हाभरात विविध कार्यक्रम राबविण्यासाठी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी निधीची मागणी केली. यावेळी तात्काळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समिती मधून 50 लाखांचा निधी जाहीर केला. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर व स्मारक समितीच्या सदस्यांनी पालकमंत्र्यांचे यानिमित्त आभार मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button