लावणी नृत्यांगना सरलाताई नांदोरेकर यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक लावणी कलावंत पुरस्कार जाहिर
अकलूज (बारामती झटका)
अकलूज येथील लावणी नृत्यांगना व नृत्य प्रशिक्षक श्रीमती सरलाताई नांदोरेकर यांना महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१९-२० या वर्षातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहिर झाला आहे. याबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
वयाच्या दहाव्या वर्षी बाबासाहेब मिरजकर यांचेकडून कथ्थक व भरतनाट्यम नृत्याचे धडे घेण्यास सुरुवात करुन वयाच्या 16 व्या वर्षी सरलाताई नांदोरेकर यांनी लावणी नृत्यास सुरुवात केली होती. लता-लंका नांदोरेकर संगीत पार्टीच्या माध्यमातून अनेक वर्ष उत्कृष्ट लावणी नृत्य केले. तर नृत्याचे प्रशिक्षण देत असताना त्यांनी लावणी बरोबरच इतर नृत्याचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या प्रशिक्षणातुन सिनेअभिनेत्री व लावणीसम्राज्ञी वैशाली जाधव, वैशाली नगरकर, प्रमीला लोदगेकर, वैशाली वाफळेकर, नेहा लखनगांवकर यांसारख्या नामवंत नृत्यागना घडविल्या.

कोल्हापुरातील बाबासाहेब मिरजकर यांच्याकडे भरतनाट्यम व कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण अवगत केलेल्या सरलाताईनीं परंपरेने चालत आलेल्या लावणी नृत्यात नाव लौकीक मिळवला. त्यांनी दोन नाटकांमध्ये मुख्य भूमिका तर व जानकी या चित्रपटात छोटासा अभिनय केला आहे. अकलुजच्या लावणी स्पर्धेत त्यांनी प्रशिक्षित केलेल्या पार्ट्यांचा प्रथम क्रमांक तसेच हॅट्रिक झाली होती. संगीत पार्टीने विजेतपद मिळवले होते, तर सहकार महर्षी जयंती समारंभ समीतीने सन 2006 चा लावणी कलावंत पुरस्कार देवुन गौरव केला होता. लावणी क्षेत्रातील मानाचा पठ्ठे बापुराव या पुरस्कारानेही सरलाताईंचा गौरव झाला आहे.

सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत मानाचा महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिला जाणारा सन २०१९-२० या वर्षातील राज्य सांस्कृतिक लावणी कलावंत पुरस्कार सरलाताई नांदोरेकर यांना जाहीर झाला आहे. दिवाळीनंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सरलाताई नांदोरेकर यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील तसेच जयंती समारंभ समितीचे सदस्य चंद्रकांत कुंभार, सुभाष दळवी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
नृत्याच्या माध्यमातून आयुष्यभर रंगदेवतेची सेवा केली. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कार जाहिर झाल्याची बातमी ऐकून आयुष्याचे सार्थक झाल्याचे वाटतंय. मला पुरस्कार मिळावा याकरीता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील व आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शासनाकडे शिफारस केली होती, त्यांना मी धन्यवाद देते. – सरलाताई नांदोरेकर
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
