वारकऱ्यांसाठी प्रशासनाने सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायमस्वरूपी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना
पंढरपूर (बारामती झटका)
पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून दूरदृष्टी प्रणालीद्वारे घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत आ. बालाजी कल्याणकर, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक तर सोलापूर येथून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद माळी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होत आहेत. पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण वारी मार्गावर व पंढरपूर शहरात चांगली स्वच्छता ठेवावी. कुठेही कचरा साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामे होतील अशी व्यवस्था करा. वारी मार्गावर फिरते शौचालय, तसेच पंढरपूर शहरात शौचालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये 24 तास ड्युटी लावून शौचालये स्वच्छ ठेवावीत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामग्री उपलब्ध करून द्या, दैनंदिन साफसफाई यासाठी आजूबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खाजगी यंत्रणांचा सहभाग घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आत्तापासूनच व्यवस्था करा. चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्क, सॅनिटायझर आधी बाबींची व्यवस्था करावी.
वारकऱ्यांसाठी बसेसची संख्या वाढवा
आषाढी वारीच्या अनुषंगाने राज्य परिवहन विभागाने ४७०० बसेसची व्यवस्था केली आहे. परंतु, यावर्षी वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होणार असल्याने आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणांनी बसेसची संख्येत वाढ करावी व भाविकांना प्रवासाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आराखडा
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकासाचा कायमस्वरूपी आराखडा होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी देशातील तिरुपती बालाजी तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा समोर ठेवून पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायमस्वरूपी विकास करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ
पंढरपूर आषाढी वारीसाठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. या टोल माफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी याला अधिकृत दुजोरा दिला नाही.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Loved the wit in this article! For more on this, click here: DISCOVER MORE. Keen to hear everyone’s views!