शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने देवळा येथील अनाथ व निराधार मुलांना मदतनिधी वाटप
गुरफटलेल्या तरूण पिढीला छ. शिवरायांचे आचार आणि ज्ञानोबा-तुकोबांचे विचार मांडत शक्ती आणि भक्तीचा मार्ग दाखवण्याची गरज चैतन्य महाराज वाडेकर
देवळा (बारामती झटका)
आजची तरुण पिढी व्यसनात गुरफटत चालल्याने ती दिशाहीन होत आहे. त्यासाठी छत्रपती शिवरायांचे आचार आणि ज्ञानोबा-तुकोबांचे विचार त्यांच्यापुढे मांडत शक्ती आणि भक्तीचा मार्ग दाखवण्याची गरज आहे, असा आशावाद युवा प्रबोधनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी जागवला. शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने शनिवार (ता.८) रोजी देवळा येथील अनाथ व निराधार मुलांना मदतनिधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य हितेंद्र आहेर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
श्री. वाडेकर श्रोत्यांशी संवाद साधताना पुढे म्हणाले कि, अनाथ, निराधार, गरजू, गरीब, पीडित यांना मदत करण्यासाठी दातृत्वाची भावना मनात असावी व जागवावी लागते. सामान्य माणसानेही अशा कार्याला बळ द्यायला हवे, पुढे यायला हवे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. डी. के. आहेर यांनी केले. यावेळी ३० अनाथ व निराधार मुलांना धनादेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी या कार्यक्रमाचा हेतू विषद करताना सांगितले कि, प्रत्येक चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो, आणि हा इतिहास आहे. त्यामुळे बोलणाऱ्यांना बोलू द्या, कारण जगात बोलणारे भरपूर आहेत, आपण कृती करणारे होऊया.
यावेळी युवा प्रबोधनकार चैतन्य महाराज वाडेकर आणि त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा कीर्तनकार संजय धोंडगे यांना शिवनिश्चल पुरस्कार, शिंदेशाही पगडी व मानपत्र देत सन्मानित करण्यात आले.

प्रत्येक सामाजिक कार्यासाठी आणि समाजहिताचे उपक्रम करण्यासाठी आपला कायम प्रतिसाद असतो, अशा शब्दात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार आहेर यांनी आपल्या मनोगतात विचार मांडले. तर कीर्तनकार धोंडगे म्हणाले की, वारकरी संप्रदाय समाजाला संस्कार, विचार, ऊर्जा, आनंद देण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच यावेळी उमराणे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे, कृषीसेवक बळीराजा संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब आहिरे यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी महारोजगार केंद्राचे संचालक भाऊसाहेब पगार, अमृतकार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत कोठावदे, अपूर्व दिघावकर, पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरवातीस शिवशाहीर सुरेश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी शाहिरी गीते व पोवाडे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.


सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गोसावी व भगवान आहेर यांनी केले तर ऋषी गोसावी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महिलावर्गासह येथील व राज्यभरातील शिवनिश्चलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवनिश्चल कोअर कमिटीच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
गेल्या सात वर्षांपासून अनाथ, निराधार मुलांसाठी मदतनिधी उपक्रम चालू आहे. आतापर्यंत आत्महत्याग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त तसेच इतर आपत्तीग्रस्त अशा अनेक कुटुंबांना व त्यातील अनाथ मुलांना शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्यावतीने मदत झाली आहे. तसेच संस्थेने मदत केलेल्या १२६ अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारले आहे. आगामी काळात अशा मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारले जाणार असल्याचे प्रा. यशवंत गोसावी यांनी सांगितले. या अनाथ मुलांच्या मदतनिधी कार्यक्रमासाठी देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. अध्यक्ष पंडितराव निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष क्रष्णा जाधव, देवळा मर्चंट बँकेचे संचालक राजेंद्र मेतकर, यांच्या सह देवळा व कळवण तालुक्यातील अनेक शिवप्रेमी तरुण, तरुणी व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शेतकरी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

