अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला…
सभापती, उपसभापती यांची खांदेपालट होऊन नवोदित संचालकांना संधी मिळणार का ?
अकलूज ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत विजयी झालेल्या 18 नवनिर्वाचित संचालकांची प्रथम सभा सोमवार दि. 22/05/2023 रोजी सकाळी 11.30 वाजता श्री. एम. एल. शिंदे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंध सहकारी संस्था अकलूज यांचे अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, ता. माळशिरस यांचे सभागृहात आयोजित केलेली आहे. सदरच्या सभेमध्ये सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी जाहीर केलेला आहे. सदरच्या सभेची नोटीस सर्व सदस्यांना देण्यात आलेली आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाची सत्ता अबाधित राहिलेली आहे. 18 सदस्यांपैकी 17 सदस्य मोहिते पाटील गटाचे व माळशिरस तालुका विकास आघाडीचे उत्तमराव जानकर निवडून आलेले आहेत. त्यामुळे मोहिते पाटील गटाचे सभापती व उपसभापती होणार आहेत. पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपलट होऊन नवोदित संचालकांना संधी मिळणार का ? अशी चर्चा सुरू आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे गत पंचवार्षिक कार्यकाळात सभापती मदनसिंह मोहिते पाटील व उपसभापती बापूराव पांढरे यांनी कार्यकाल पूर्ण केलेला आहे. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मदनसिंह मोहिते पाटील, शहाजीराव देशमुख व बापूराव पांढरे हे तीन सदस्य पूर्वीच्या संचालक मंडळात होते. उर्वरित 14 सदस्य नवीन आहेत. सभापती व उपसभापती यांची खांदेपालट होऊन नवोदित संचालक, ॲड. भानुदास राऊत, लक्ष्मणराव पवार, संदीप पाटील, पोपटराव भोसले, मारूतराव उर्फ आप्पा रुपनवर या नवोदित संचालकांना संधी मिळणार का ? अशी चर्चा सुरू आहे.
गत वेळचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व उपसभापती बापूराव पांढरे यांना पुनश्च संधी मिळणार, अशीही चर्चा सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील राजकीय वातावरण बदलत्या समीकरणावर असल्यामुळे बदल होईल अशी चर्चा आहे. मात्र, विश्वासनीय सूत्रांकडून बदल होणार नाही अशीही चर्चा सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng