अकलूज-वेळापूर रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनांचा खुळखुळा तर प्रवास करणाऱ्या जनतेच्या शरीराचा खिळखिळा अशी अवस्था…
रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी दयनीय अवस्था रस्त्याची झाली आहे एक खड्डा चुकवायला गेले की चार खड्ड्यात वाहन आढळत…
मंत्री लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी मोटरसायकल अथवा ट्रॅक्टरच्या ट्रेलरमध्ये बसून प्रेक्षणीय रस्त्यावरून फेरफटका मारावा, सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
अकलूज ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील अकलूज-वेळापूर रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे कि, या रस्त्याने प्रवास करणाऱ्या दोन चाकी, चार चाकी वाहनांचा खुळखुळा झाला आहे तर प्रवास करणाऱ्या जनतेचे शरीरातील अवयवांचा खिळखिळा झाला आहे, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. वेळापूर-अकलूज रस्त्याची रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था झालेली आहे. एखादा वाहनधारक एक खड्डा चुकवायला गेला की चार खड्ड्यात वाहन आदळत आहे. खड्डा न चुकवता गेल्यास खड्ड्यात आदळत आहे. काय करावे, असा मोठा प्रश्न वाहनधारकांना आहे. यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांनी मोटरसायकल अथवा ट्रॅक्टरच्या टेलरमध्ये बसून वेळापूर-अकलूज प्रेक्षणीय पर्यटन रस्त्यावरून फेरफटका मारावा, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. त्यामुळे त्यांना जनतेचे हाल प्रत्यक्ष अनुभवण्याचा अनुभव मिळेल, म्हणजे कुठेतरी या रस्त्याच्या प्रश्नासाठी वाचा फुटेल.
अकलूज माळशिरस तालुक्यामध्ये नेहमी शासकीय कामे अथवा उद्योग, व्यापार किंवा मेडिकल हब असल्यामुळे दवाखान्यात ये-जा करावी लागते. रात्री-अपरात्री रस्त्यावरून जात असताना खड्ड्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान तर झालेलेच आहे. तर काहींनी कायमचे अवयव देखील गमावलेले आहेत. काही अपघातामध्ये वाहनधारकांचे बलिदान सुद्धा गेले आहे.
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे महाविकास आघाडी सरकार होते, त्यांचेही दुर्लक्ष होते. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे सरकार आहे. कितीतरी महिने झाले तरीसुद्धा याही सरकारचे या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे. सर्वसामान्य जनतेला सरकार बदलले तरी त्यांची मानसिकता बदललेली नाही फक्त सर्दी गेली आणि पडसे आले असे वाटायला लागलेले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी वेळीच लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्याचे फर्मान काढावे. सुरुवात माळशिरस तालुक्यातील अकलूज-वेळापूर या रस्त्यावर करावी, कारण पंढरपूर, सांगोला, सोलापूर, मिरज, सांगली, कोल्हापूर तसेच इंदापूर, बारामती, पुणे, मुंबई या शहरातील वाहनधारकांचा दैनंदिन संबंध येत आहे. शिवाय तालुक्यातील शेतकरी बांधव, शाळेतील विद्यार्थी, दवाखान्यातील रुग्ण व त्यांची सेवा करणारे घरातील मंडळी यांना या वेळापूर-अकलूज रस्त्याची अडचण होत आहे. तरी गांभीर्याने रस्ता त्वरित करावा, अशी पीडित जनतेची मागणी आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng