अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा यांच्याकडून दिल्ली येथील 25 जुलैच्या जंतर मंतरवर होणाऱ्या आंदोलनाची जय्यत तयारी,

१००० मराठा बांधव दिल्लीत दाखल होणार – युवक जिल्हाध्यक्ष मयूर सोळसकर
दौंड (बारामती झटका)
सोनाई लॉन्स येथे मराठा महासंघाची आढावा बैठक घेण्यात आली. आढावा बैठकीमध्ये आंदोलनाची पूर्वतयारी व निवडी करण्यात आल्या. यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग संपन्न झाली. यावेळी प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख गोरख भाऊ कामठे, युवक जिल्हाध्यक्ष मयूर सोळसकर, पुणे जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष विशाल कुंजीर, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुरज चोरगे, पुरंदर तालुका अध्यक्ष चंदन मेमाणे, दौंड तालुका शेतकरी आघाडी अध्यक्ष विशाल राजवडे, प्रशांत उरसळ, पुरंदर युवा अध्यक्ष संदीप मोकाशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा समाजासाठी आरक्षण हा विषय १९८१ साली स्व. आमदार आण्णासाहेब पाटील व स्व. ॲड. शशिकांतआप्पा पवार यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून पहिल्यांदा ऐरणीवर आणला. तेव्हापासून २०१६ मधील क्रांती मोर्चा निघेपर्यंत यासाठी मराठा महासंघाने मोर्चे, उपोषणे, रास्ता रोको, परिसंवाद, अशी विविध आंदोलने केली. मराठा क्रांती मोर्चाने इतिहास घडवला. ५८ मोर्चे काढले, परंतु मूळ मागणी अद्याप तशीच प्रलंबित आहे. म्हणून २५ जुलै २०२३ रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दिलीपदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय उपोषण आंदोलन होणार आहे. मराठा समाजाला 50% च्या आतून आरक्षण मिळत नसेल तर संविधानिकरीत्या 50% च्या वर कायद्यामध्ये बदल करून इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून दिल्ली येथे एक दिवसीय जंतर-मंतरवर तीव्र आंदोलन होत आहे. या आंदोलनाला संपूर्ण राज्यभरातून मराठा बांधव येणार आहेत. जिल्ह्यातूनही चांगल्या पद्धतीची तयारी झाल्याची माहिती युवक जिल्हाध्यक्ष मयूर सोळसकर यांनी दिली.

२०१४ व २०१९ या दोन्ही साली आरक्षण दिले परंतु, ५०% जवळ मर्यादा वाढून दिलेले आरक्षण कोर्टामध्ये टिकले नाही. त्यामुळे आता ५०% च्या आत आरक्षण द्या किंवा घटनादुरुस्ती करून संविधानिकरित्या आरक्षण द्या, अशी महासंघाची मागणी आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, हरियाणातील जाट समाज, राजपूत समाज, मणियार समाज, पटेल समाज, यांना सुद्धा आरक्षणाचा फायदा मिळावा, ही महासंघाची भूमिका आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राष्ट्रीय चिटणीस दशरथ पिसाळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष गुलाबराव गावंडे, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष रणजीतदादा जगताप, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्रीरंग बर्गे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.
सदर बैठकीमध्ये दौंड तालुक्यातील काही निवडी करण्यात आल्या. यामध्ये शिरूर हवेली विधानसभा युवक अध्यक्ष अतुल कुंजीर यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे सदर दौंड तालुका युवक संपर्कप्रमुख पदी चंद्रकांत आखाडे, दौंड तालुका व्यापार उद्योग आघाडी कार्याध्यक्षपदी अमोल चौंडकर, दौंड तालुका युवक कोषाध्यक्षपदी स्वप्निल शिर्के, दौंड तालुका युवक सरचिटणीस पदी समीर गव्हाणे यांची निवड करण्यात आली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng