अन्न सुरक्षा योजनेत गरजवंत लाभार्थ्यांचा समावेश करावा – डॉ. भाई बाबासाहेब देशमुख
अन्न सुरक्षा योजनेमध्ये गरजु कुटुंबांचा समावेश करावा, अशी मागणी डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः आजारी असताना केली
सांगोला ( बारामती झटका)
सध्या केंद्र व राज्य शासनाने संयुक्तरित्या राज्यांमध्ये जे लाभार्थी गरज नसताना या योजनेमध्ये आहेत, अशा नागरीकांनी स्वतःहुन या योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. त्यासाठी सरकारने रेशन दुकानदाराकडे एक फॉर्म दिला आहे तो भरायचा आहे. सांगोला तालुक्यात साधारण अन्न सुरक्षा योजनेमध्ये सध्या सतरा हजारच्या आसपास लाभार्थी आहेत. त्यामध्ये काही लाभार्थी गरज नसताना समाविष्ट असतीलही, नाही असे नाही. पण ज्यांच्याकडे बंगला आहे, चारचाकी गाडी आहे, पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे, जे आय. टि. रिटर्न भरतात, नोकरदार आहेत, अशांनी स्वत:हुन या योजनेतून बाहेर पडावे, असे सरकारने जाहीर केले आहे.
आजच्या तारखेपर्यंत सांगोला तालुक्यातुन किमान दोनशे ते अडीचशे नागरीकांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी स्वत:हुन फॉर्म भरले आहेत. आणखी काही नागरीक भरतीलही व सरकारला सहकार्य करतील, यात शंका नाही. परंतु, या योजनेमध्ये समावेश होणे गरजेचे आहे, अशा पात्र कुटुंबाची संख्या किती आहे, याचाही सर्वे केला पाहिजे.
अन्न सुरक्षा योजनेमध्ये लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहु व तीन रुपये किलो तांदूळ मिळाला जातो. या योजनेचा खराखुरा लाभ जर पात्र कुटुंबांना झाला, ज्यांना आपल्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी या योजनेतील धान्य गरजवंत लाभार्थ्यांना मिळेल.
एकतर लोकांना निसर्गाच्या अवकृपेमुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेती व्यवसाय धोक्यात आहे. शेतीवरती अवलंबुन असणारे व्यवसाय अडचणीत आले आहेत. सरकारांच्या धोरणामुळे शेतीमालाला भावमिळत नाहीत. शेतमालाला खर्चाच्या आधारीत हमी भाव नाही. अशा अनेक अडचणीला नागरीक तोंड देत आहेत. आणि महागाईचा तर आगडोंब उसळला आहे. अशा परिस्थीतीत गरजु कुटुंबासाठी दोन व तीन रुपये किलो भावाने मिळणारे अन्न सुरक्षा योजनेचे धान्य फार गरजेचे आहे.
सरकारच्या आवाहनाला जर नागरीक स्वत:हुन सहकार्य करीत असतील तर जे गरजवंत लाभार्थी असतील अशा कुटुंबांचा योग्य प्रकारे सर्वे करुन त्यांना अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश करणे हि सरकारची जबाबदारी आहे. सध्या राज्यात या योजनेतून किती नागरीक स्वत:हुन बाहेर पडले, याचीही माहीती लवकरच घेण्यात येईल व हा प्रश्न संपुर्ण राज्यातील गरजु लाभार्थी कुटुंबासाठी महत्वाचा आहे.
राज्यातील अशा कुटुंबाचा सर्व्हे करुन त्यांचाही समावेश अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश व्हावा व अशा गरजु कुटुंबांना धान्य मिळावे यासाठी लवकरच शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा विषय घेऊन त्यावरती विचारविनीमय करुन राज्य सरकारकडे शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातुन व शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागणी करण्यात येईल व त्यासाठी गरज पडल्यास लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन राज्यभर आंदोलन करण्यात येतील. कारण अशा लोकांच्या जीवनमरणाशी निगडीत असलेले प्रश्न मांडण्याची व ते सोडवुन घेण्याची परंपरा स्व. गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब व स्व. प्रा. एन. डी. पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. त्यांचीच प्रेरणा घेऊन आजही शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना कायम लढणार आहे.
आज सांगोला विधानसभा मतदार संघातील नागरीकांची अन्न सुरक्षा योजनेमध्ये गरजु कुटुंबांचा समावेश करण्याची मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांना केली असल्याची माहीती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng