सदाशिवनगर येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी
सदशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर, राऊत वस्ती या ठिकाणी गेली सतरा वर्ष श्री. संत सावता माळी महाराज प्रतिष्ठान यांच्यामार्फत दरवर्षी अरण ते सदाशिवनगर ज्योती यात्रा आयोजित करण्यात येते. कोरोना काळात दोन वर्ष साध्या पद्धतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावर्षी मोठ्या प्रमाणात तरुण व अबालवृद्ध यांनी यामध्ये भाग घेऊन उत्साहात व आनंदी वातावरणात ज्योत आणली. ज्योत आणताना अल्पोपहाराची सोय देविदास शिंदे यांच्या वतीने करण्यात आली होती.

तसेच सदाशिवनगरमध्ये ज्योत आल्यानंतर विविध ठिकाणी ज्योतीचे स्वागत करण्यात आले होते. तसेच काल संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर आज सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. संपत करणे महाराज अंद्रुड यांचा किर्तन सोहळा या ठिकाणी पार पडला.


“कांदा, मुळा, भाजी,
अवघी विठाई माझी,
लसूण, मिरची, कोथिंबीर,
अवघा झाला माझा हरी”
संपत महाराज यांनी आपल्या कीर्तनातून श्री संत सावता माळी महाराज यांचे जीवन चरित्र अतिशय चांगल्याप्रकारे श्रोत्यांसमोर मांडले. यासाठी मृदंग वादक, गायक व टाळकरी यांनी त्यांना मोलाची साथ दिली. किर्तन सोहळ्यासाठी सदाशिवनगर व परिसरातून मोठ्या संख्येने सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींनी यासाठी उपस्थिती दर्शवली.


श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी श्री. ज्ञानेश राऊत, उपाध्यक्षपदी श्री. दीपक राऊत व कार्याध्यक्षपदी महेश नाळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांचा सत्कार संपत महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार अध्यक्ष ज्ञानेश राऊत यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng




