ईश्वराची दररोज मनोभावे भक्ती केल्यास आत्मिक समाधान व खरा आनंद लाभतो – व्हा.चेअरमन अशोक लुणावत
माढेश्वरी बँकेच्या वतीने श्री संत ज्ञानराज माऊलींच्या पादुका व दिंडीचे पूजन
माढा (बारामती झटका)
भाविकांनी फक्त मोठ्या एकादशी दिवशीच विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पूजन व प्रार्थना न करता आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या युगात व्यस्त कामकाजातून काही वेळ शिल्लक ठेवून दररोज ईश्वराची मनोभावे भक्ती केल्यास आत्मिक समाधान लाभून जीवनाचा खरा आनंद मिळतो, असे प्रतिपादन माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन अशोक लुणावत यांनी केले. ते माढेश्वरी अर्बन बँकेच्या वतीने श्री संत ज्ञानराज माऊली यांच्या पायी दिंडी सोहळ्याच्या पूजनाप्रसंगी दि. ४ जुलै रोजी बोलत होते.

जालना जिल्ह्यातील तालुका बदनापूर येथील श्री क्षेत्र पावनधाम आश्रम डोंगरगाव येथील श्री ह.भ.प. कृष्णाजी व्यवहारे महाराज यांच्या आशीर्वादाने मागील दहा वर्षापासून श्री क्षेत्र पावनधाम आश्रम ते श्री क्षेत्र पंढरपूर असा पायी दिंडीचा सोहळा माढा येथे सोमवारी आल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका व प्रतिमेचे पूजन बँकेचे व्हा. चेअरमन अशोक लुणावत, बँकेच्या संचालिका मंगल लुणावत व मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

याप्रसंगी बोलताना ह.भ.प. उद्धव घनगाव महाराज म्हणाले की, पांडुरंगाच्या दर्शनासाठी ऊन, वारा, पावसाची कसलीही तमा न बाळगता अक्षरशः देहभान हरपून मागील दहा वर्षापासून आमच्या पायी दिंडीत जवळपास 400 भाविक भक्त सहभागी असतात. पंढरीच्या दिशेने ज्ञानोबा माऊली व हरिनामाचा जयघोष करीत मोठ्या भक्ती भावाने आम्ही जातो, याचे आम्हाला आत्मिक समाधान लाभते. कोरोनाचा अपवाद वगळता कितीही संकटे व अडचणी आल्या तरी आम्ही विठ्ठलाची वारी चुकू देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

माढेश्वरी अर्बन बँकेचे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे व व्हा. चेअरमन अशोक लुणावत यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडीतील व इतर भाविकांना बँकेच्या वतीने महाप्रसाद व फराळाचे नियोजन केले होते. निवासाची व इतर व्यवस्था माढा येथील साई पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आली होती.

याप्रसंगी दिंडीचे चोपदार ह.भ.प. रणजीत महाराज शिनगारे, ह.भ.प. बद्री महाराज शेळके, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे, वसुली अधिकारी राजकुमार भोळे, वरिष्ठ अधिकारी निलेश कुलकर्णी, शाखा अधिकारी संजय गायकवाड, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, विपुला लुणावत, विजय मुळे, विक्रम पाटील, शिवाजी घाडगे, सागर काळे, अक्षय कवटे, अरुण डोंगरे, श्रीरंग सोनवणे, अतुल लंकेश्वर, ज्योतीराम घळके, अनिल उदघाले यांच्यासह वारकरी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
