Uncategorizedताज्या बातम्या

कामचुकार ग्रामसेवकांना लागणार आता लगाम !

मुंबई (बारामती झटका)

ग्रामपंचायत कार्यालयात वेळेत आणि नियमित न येणाऱ्या ग्रामसेवक भाऊसाहेबांच्या मनमानीला आता चांगलाच चाप लागणार असून त्यांना आता  बायोमेट्रिक हजेरी प्रणालीवरच आपली उपस्थिती नोंद करावी लागणार आहे. 

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी नागरिकांना अनेकदा भेटत नाहीत. गावकरी कामासाठी हेलपाटे मारतात पण ग्रामसेवक भाऊसाहेब जागेवर नसतात, गावाच्या समस्येकडे त्यांचे लक्ष तर नसतेच पण शिपाई आणि अन्य कर्मचारी यांच्यावर ग्रामपंचायतीचा कारभार सोपवून भाऊसाहेब गुल झालेले असतात. एका ग्रामसेवकाकडे आणखी एखाद्या गावाचा कारभार असला की मग तर त्यांना रान मोकळे होते. त्या गावातील लोकांना हीच कारणे देत आपण दुसऱ्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात होतो असे बिनधास्त ठोकून देतात. गावकरी टाहो फोडत असतात पण हे महाशय कान आणि डोळे देखील बंद करून बसलेले असतात. त्यामुळे गावकरी,शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होतो. याला आवर करण्यासाठी आता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

वेळेत हजर न राहणे, कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांना चांगलाच चाप बसणार आहे. गावांमध्ये सरपंचाप्रमाणे ग्रामसेवक हे पदही महत्त्वाचे आहे. पण ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आपल्याला दिलेल्या वेळेवर हजर राहात नसल्याने नागरिकांच्या समस्या अनेक दिवस प्रलंबित राहतात. याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील करुळ गावचे ग्रामस्थ गोविंद कामतेकर यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधले. ग्रामसेवक यांची कामाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० असून शनिवार व रविवार या दोन्ही दिवस सुट्टी असते. पण अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक सकाळी ११ वाजल्यानंतर कार्यालयात हजर होतात आणि सायंकाळी ४ वाजल्यानंतर गायब होतात.

कार्यवाहीचा अहवाल सादर करा, राज्याच्या ग्रामविकास विभागाने ५ जानेवारी २०२३ रोजी एका पत्राद्वारे राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागीय आयुक्तांना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले. एवढेच नाही तर, प्रवेशद्वारावर जनमाहिती अधिकारी फलक लावण्याबाबत सांगण्यात आले आहे. (Village sevaks have to provide biometric attendance) याबाबत कोणती कार्यवाही केली, याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button