चाकणमध्ये उच्चशिक्षित शेवकरी आणि आहेर यांचा फुले एज्युकेशन तर्फे ५० वा सत्यशोधक विवाह सोहळा होणार

चाकण (बारामती झटका)
फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता चाकण, आंबेठाण चौक, येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्त्या अखिल भारतीय समता परिषदच्या सौ. मंगल शेवकरी यांची उच्चशिक्षित सत्यशोधिका दीपाली विश्वनाथ शेवकरी (B.C.A., L.L.B.) चाकण आणि समाजसेवक बाळकृष्ण आहेर यांचे सत्यशोधक पंकज आहेर (C.A.) यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हे नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पडणार आहे, तर महात्मा फुले रचित मंगलाष्टकाचे गायन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे हे करणार आहेत.
यावेळी वधू वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम भेट दिली जाणार आहे. यावेळी वधू-वर यांचे आई-वडील व मामा-मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सन्मान पत्र देण्यात येणार आहे. या वेळी सुरवातीला वधू वर यांचे शुभहस्ते नुकतेच चाकणमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पूर्णाकृती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास व विवाह स्टेजवरील फुले दाम्पत्य अर्थ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून याप्रसंगी अंधश्रद्धा व कर्मकांड याला छेद देत वधू-वर यांचेकडून शपथ व दीप प्रज्वलन करून 7 वचने घेऊन 7 फेरे पूर्ण करणार आहेत.

यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून त्या सर्वांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले ग्रंथ आयोजक सौ. मंगल शेवकरी हे भेट देणार आहेत, असे विधीकर्ते ढोक यांनी माहिती दिली आहे. तसेच चाकण येथील मोनिका हॉटेल मध्ये दि. १९ मार्च २०१९ रोजी संस्थेच्या वतीने पहिला सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला होता आणि येत्या रविवारी हा ५० वा सत्यशोधक विवाह सोहळा होणार आहे. तसेच दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सांगोला, घेरडी येथे ५१ वा सत्यशोधक विवाह होणार असून ३९५ व्या शिवजयंती दिनी दि. १९ फेब्रुवारी २०२५ ला १२ वा. गृहप्रवेश सोहळा सत्यशोधक पद्धतीने हिंगोली, कळमनुरी येथे होणार असल्याचे ढोक यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.