कॉलमच्या उड्डाणपुलासाठी सारा गाव एकवटला, आता प्लेटचा उड्डाणपूल गावाच्या एकीने हटला.
सर्वपक्षीय नेते मंडळी, व्यापारी, स्थानिक नागरिक व ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे भविष्यातील अनेक पिढ्यांचा कायमचा प्रश्न मिटणार…
सदाशिवनगर व पुरंदवडे गावात भव्य मोर्चा व गाव बंदला १००% टक्के प्रतिसाद
सदाशिवनगर (बारामती झटका)
पुरंदावडे सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतून अखंड प्लेटचा उड्डाणपूल जात आहे. त्यामुळे दोन्ही गावचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आजूबाजूच्या गावांचे दळणवळण, उद्योग, व्यवसाय, शेतकरी, ऊस वाहतूक, शाळकरी विद्यार्थी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जर प्लेटचा उड्डाणपूल झाला तर सर्व व्यापारी वर्गाचे गावातील रहिवाशांचे अतोनात नुकसान होणार आहे. कारण, सदाशिवनगर पुरंदावडे गाव हे ज्यादा प्रमाणात रोडच्या कडेला वसलेले असून या ठिकाणी महाराष्ट्राचे श्रद्धास्थान संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील पहिला गोल रिंगण सोहळा पार पडतो.
तसेच सहकारी साखर कारखाना, मंगल कार्यालय, दूध चीलिंग सेंटर, अंगणवाडी ते बारावीपर्यंत शाळा, पेट्रोल पंप, पोस्ट ऑफिस, सहकारी बँक, महसूल ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय, दवाखाने हे सर्व रोडच्या दोन्ही बाजूला आहेत. जर प्लेटचा उड्डाणपूल झाला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी गोल रिंगण सोहळ्यास खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे. तसेच कारखाना चालू सीझनमध्ये बैलगाडी, घंटागाडी, ट्रॅक्टर व ट्रक मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक करत असतात. त्यामुळे या ठिकाणी दुकानासमोर गाड्या लावण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. अर्थातच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कारखाना व मोठी शाळा असल्यामुळे दशक्रुशीतील शेतकरी, नागरिक, ग्रामस्थ, प्रवासी, व्यापारी, औषध उपचार, खते, बी-बियाणे, शालेय व शासकीय कामानिमित्त सदाशिवनगर पुरंदावडे या ठिकाणी येत असतात. तरी स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी वर्ग यांचे जनजीवन प्रचंड प्रमाणात प्रभावित होणार आहे.
या अनुषंगाने सर्वांची एकच मागणी आहे की, प्लेटचा उड्डाणपूल रद्द करून कॉलमचा उड्डाणपूल करण्यात यावा. यासाठी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी गावातील सर्व पक्षीय नेते मंडळी राजकीय भेदभाव बाजूला ठेवून उड्डाणपूलासाठी एकत्र आले होते. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून आंदोलनात सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून गावातून भव्यदिव्य मोर्चा रॅली काढण्यात आली. यानंतर मोर्चा ग्रामपंचायत या ठिकाणी येऊन रस्ता रोकोसाठी सर्वांनी रस्त्यावर ठाण मांडले. यावेळी गावातील महिलांची उपस्थिती लाक्षणिक होती. यावेळी उड्डाणपूल समितीचे अध्यक्ष पोपट गरगडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर गावातील जेष्ठ मंडळीची भाषणे झाली. यानंतर प्रकल्प संचालक पंढरपूरचे प्रतिनिधी प्रसाद साहेब तसेच माननीय विभागाय अधिकारी अकलूजचे समिंदर साहेब यांना मोर्चाचे निवेदन देण्यात आले. व जोपर्यंत याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचे आश्वासन दिले. सदाशिवनगर व पुरंदावडे गावातील सर्व ग्रामस्थ, व्यापारी व गाळेधारक यांनी यावेळी आपली दुकाने बंद ठेवून उस्फूर्तपणे मोर्चात भाग नोंदवल्याबद्दल उड्डाणपूल संघर्ष समितीचे अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article really resonated with me. The points made were compelling. Id love to hear more opinions. Click on my nickname for more!