ह्रदयद्रावक घटना, महाळुंगमध्ये विजेचा शॉक लागून दोन महिला आणि गाय ठार

गाईच्या गोठ्यात शॉकने तीन जीव गेले
महाळुंग (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील ढवळे वस्तीवर एक हृदयद्रावक आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गाईच्या गोठ्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे दोन महिलांसह एका जर्शी गाईचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
रशिका विठ्ठल रेडे (वय 57), सुवर्णा अमोल रेडे (वय 27) माहेरकडचे नाव सुवर्णा भास्कर भोसले अशी मृतांची नावे असून एक जर्शी गाय देखील ठार झाली आहे.
सकाळी सुमारे 6 च्या सुमारास रशिका रेडे यांनी नेहमीप्रमाणे गाईच्या गोठ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. गोठ्यात गेल्यानंतर गाईला शॉक लागून ती खाली पडलेली दिसली. गाईला उठवण्याचा प्रयत्न करत असताना रशिकाबाईंना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळात सुवर्णा रेडे या परिस्थिती पाहण्यासाठी गोठ्यात गेल्या, मात्र, त्याही विजेच्या संपर्कात आल्या आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेचे कारण अद्याप तपासाअंती स्पष्ट व्हायचे आहे. मात्र, रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोठ्याच्या पत्राशेडमध्ये पाणी साचून, तिथे शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेचा तपास अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक भोसले करत असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. ही घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली असून एकाच कुटुंबातील दोन महिलांचा व एक गाईचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



