घरच्या मातोश्री लक्ष्मीच्या आशिर्वादाने रोडवरच्या लक्ष्मीच्या सहकार्याने अनेक लक्ष्मी पुजण्याचे भाग्य परिवाराला मिळाले
जिद्द, चिकाटी, मेहनत व प्रामाणिकपणे समाजकारण व राजकारण करून निष्ठावान कार्यकर्त्यांच्या प्रगतीचा चढता आलेख पहावयास मिळत आहे.
मांडवे ( बारामती झटका )
मांडवे ता. माळशिरस येथील सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तानाजी जगन्नाथ पालवे उर्फ तानाजीआबा यांनी घरच्या मातोश्री लक्ष्मीबाई जगन्नाथ पालवे यांच्या आशीर्वादाने रोडवरच्या जुन्या ट्रकच्या रूपाने असलेल्या लक्ष्मीच्या सहकार्याने तुळजाभवानी मातेच्या कृपेने अनेक लक्ष्मी पुजण्याचे भाग्य पालवे परिवारातील सदस्यांना मिळालेले आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे गावचे माजी सरपंच तानाजी पालवे यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत व प्रामाणिकपणे समाजकारण व मोहिते पाटील यांच्या सहकार्याने राजकारण करून निष्ठावान कार्यकर्त्यांच्या प्रगतीचा चढता आलेख पहावयास मिळत आहे.
सौ. लक्ष्मीबाई व श्री. जगन्नाथ पालवे यांना दोन मुले सुरेश व तानाजी अशी आहेत. परिस्थिती गरीबीची व बेताची होती. जगन्नाथ पालवे याचे कुटुंब मोठे होते. सर्व मिळून सात भावंड, जमिन थोडीशी पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्या इतपत उत्पन्न होते. जगण्याची पंचाईत असल्याने शिक्षणाचा विषयच येत नव्हता. तरी सुद्धा दहावीपर्यंतचे शिक्षण तानाजी पालवे यांनी घेतले. माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते तत्कालीन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या आशीर्वादाने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील महाविद्यालय मांडवे येथील शाळेत शिपाई म्हणून 1992 – 93 साली कामाला लागले होते. दिड ते दोन वर्ष नौकरी केली होती. नौकरी करून फक्त आपलाच प्रपंच करावा लागेल, सर्व सामान्य जनतेची सेवा समाजकारण व राजकारण करून केल्याशिवाय समाधान होणार नाही. असा विचार करून शिपाई पदाची नोकरी सोडून दिली मात्र, बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली मांडवे पंचक्रोशीत सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे काम सुरू केले होते.
मोहिते पाटील यांचा विश्वास संपादन केलेला होता. तरूण वयात बाळदादा यांच्या आशीर्वादाने 2004 साली पोट निवडणुकीत थेट पंचायत समिती सदस्य तानाजीआबा पालवे यांना बहुमान मिळालेला होता. याच संधीचे सोने करून गावांमध्ये विकासगंगा आणलेली होती. पंचायत समितीचे सदस्य असताना केलेली जनतेची व सर्व सामान्यांची कामे करत असताना मोहिते पाटील यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे मांडवे ग्रामपंचायतीचा कारभार सलग दहा वर्षे यशस्वीरित्या करून गावाला जिल्हा व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळवून दिलेले होते.
गावामध्ये सत्तेवर असताना समाजहिताच्या योजना मंजूर करून यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले होते. विकासाची कामे करीत असताना फायदा तोट्याचा कधीच विचार केला नाही. दर्जेदार व उत्कृष्ट काम मापापेक्षा जास्तच काम केलेले होते. गत निवडणुकीत हनुमान पॅनलमधील काही नेते व कार्यकर्ते यांनी श्रीराममध्ये प्रवेश केलेला होता. तरीसुद्धा गावातील मतदारांनी दोन्ही पॅनलचे समान उमेदवार निवडून देऊन एका उमेदवारास समान मते दिलेली होती. चिट्टी मात्र श्रीराम पॅनलची निघालेली होती.
हनुमान पॅनलचे प्रमुख तानाजी पालवे यांनी गावातील जनतेच्या अडीअडचणी सोडवत आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने तानाजी पाटील यांची आर्थिक प्रगती सुरू झाली.
जे. एम. म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड पनवेल या कंपनीस प्लांट टाकण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये सत्ता असताना तानाजी पालवे यांनी सहकार्य केलेले होते. त्यामुळे कंपनीचे प्रकल्प मॅनेजर सुब्रमण्यम यांनी तानाजी पालवे यांना पालखी महामार्गाच्या रस्त्यावरील काम दिलेले होते.
तानाजी पालवे यांचे कडे P4 /700 मशीन होते आणि मशीन ने-आण करण्याकरता जुनी ट्रक होती. त्या ट्रकला केबिनमध्ये सामान नव्हते, काचा नव्हत्या, ड्रायव्हरला बसण्यास सीटवर गादी नव्हती, अशी गाडी होती. दिसायला छडमाड मात्र, कधीही स्टार्टर मारला तरी गाडी सुरू होणार आणि ज्या ठिकाणी मशीन कामाला जाणार आहे त्या ठिकाणी गाडी मशीन घेऊन जात होती. अशी रोड लक्ष्मी असणारी लहान ट्रक पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक दिवस उभा राहिलेली होती.
तानाजी पालवे हे सुद्धा काम सुरू असताना कामाच्या ठिकाणी उन्हात, पावसात तटस्थ उभे राहून होते. विरोधकांना रस्त्यावर उभा राहिलेले तानाजी पालवे पाहून मनाला समाधान वाटत असल्यासारखे वाटत होते. मात्र, तानाजी यांनी कठीण परिस्थितीतून जीवनाला सुरुवात केलेली असल्याने समोर उज्वल भवितव्य दिसत असावे. तानाजी यांनी पालखी महामार्गाचे काम दर्जेदार व उत्कृष्ट प्रकारे केलेले आहे.
तानाजी पालवे यांचे रस्त्यावर काम सुरू असताना बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांची वेळोवेळी भेट होत असत.
एकदा अशीच भेट झाल्यावर रोडच्याकडेला चहा पिण्याकरिता तानाजी पालवे समवेत थांबलेले होते. त्याचवेळी माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील नातेपुते येथे बाबाराजे देशमुख व मामासाहेब पांढरे यांच्याकडे स्नेहभोजनासाठी रस्त्यावरून जात असताना तानाजी पालवे यांच्याकडे विजयदादांचे लक्ष गेले. गाडी सुसाट होती पाठीमागे पुढे वाहने होती. त्यामुळे गाडी एक ते दीड किलोमीटर नातेपुतेच्या पुढे गेलेली होती. विजयदादांची गाडी माघारी आल्यानंतर तानाजी पालवे यांनी उठून नमस्कार घातला. त्यावेळेस दादांनी मास्क घातला नाही, असे पहिल्यांदा विचारले, म्हणजेच मोहिते पाटील यांचे तानाजी पालवे यांच्यावर मनापासून प्रेम भावना दिसत होती. यावेळी सकारात्मक चर्चा केली आणि विजयदादा नातेपुतेकडे रावाना झाले.
तानाजी पालवे यांनी पालखी महामार्गाच्या रस्त्यावर काम करीत असताना प्रकल्प मॅनेजर सुब्रमण्यम यांनी तानाजी पालवे यांच्या कामाची पद्धत अधिकाऱ्यांशी व्यवस्थित वागणूक या सर्व गोष्टीमुळे सुब्रमण्यम यांचे सहकार्य मोलाचे लाभलेले होते. रस्त्यावर काम करीत असताना दुसऱ्याच्या टिप्परने काम केलेले होते, याची खंत तानाजी पालवे व मित्रपरिवार यांना होती. सुब्रमण्यम यांच्या सहकार्याने तानाजी पालवे यांनी तीन टिपर खरेदी करून शुक्रवारी घराच्या व श्री तुळजाभवानी मंदिराच्या आवारात मातोश्री सौ. लक्ष्मीबाई व पिताश्री श्री. जगन्नाथ घरातील चुलते, चुलती, चुलत बंधू आणि लक्ष्मणासारखा असणारा बंधू सुरेश या सर्वांच्या शुभहस्ते वाहनांचे पूजन करण्यात आले.
शनिवारी ग्रामपंचायत व श्री हनुमान मंदिर परिसर येथे राजकारण व समाजकारण यासाठी गावातील कायम सोबत असणारे नेते मंडळी व मित्रपरिवार यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. तानाजी पालवे यांनी घराशेजारी स्वखर्चाने श्री तुळजाभवानी मंदिर व ग्रामपंचायत शेजारी लोकवर्गणी मधून श्री हनुमान मंदिराची उभारणी केली आहे. त्यामध्ये मदतीचा सिंहाचा वाटा आहे. आई वडील यांच्या आशीर्वादाने कुलदैवत श्री तुळजाभवानी व ग्रामदैवत श्री हनुमान यांच्या आशीर्वादाने आणि रोड लक्ष्मीच्या सहकार्याने अनेक लक्ष्मी पुजण्याची भाग्य पालवे परिवारातील सदस्य व गावातील मित्रमंडळी यांना मिळाले आहे.
तानाजी पालवे यांनी तीन टिपर आणले यात नवल काय, अशी सुद्धा शंका वाचकांना येणार आहे. कारण मोठ्या बुमचे 50 पोकलेन मशीन आणणारे माळशिरस तालुक्यात कारूंडे गावचे लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच अमरशेठ जगताप व अजितशेठ जगताप यांचे रेकॉर्ड आहे. कितीतरी जणांनी टिपर, पोकलेन मशीन आणलेले आहेत. त्यांच्यामध्ये आणि तानाजी पालवे यांच्यामध्ये फरक आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागली, गरीब परिस्थितीमध्ये शाळेत शिपायाची नोकरी केली.
अशा कठीण परिस्थिती सुसंस्कृत आई-वडिलांचे विचार व जयसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील परिवारातील सदस्यांची साथ यामुळे यशस्वी शिखरावर पोहोचलेल्या तानाजी पालवे यांचा मांडवेकरांना सार्थ अभिमान आहे. समाजकारण व राजकारण करीत असताना तानाजी पालवे यांनी अनेक लोकांना मदत केलेली आहे. सर्व जातीधर्मातील सर्वसामान्य गोरगरीबांचा वाली म्हणून तानाजी पालवे यांच्याकडे पाहिले जाते. सत्ता असो वा नसो, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळीमध्ये नवीन कपडे देण्याचे काम असते.
कोणत्याही अडचणीतील माणसाला मदत करण्याचे काम तानाजी पालवे यांनी आजपर्यंत केले आहे. तानाजी पालवे यांच्याकडे दुसऱ्याला मदत करण्याची दानत आहे. यापुढेही सुरूच राहणार आहे. तानाजी पालवे यांचा सुसंस्कृत स्वभाव, सहकार्याची व मदतीची भावना यामुळे यांच्या प्रगतीचा आलेख असाच वाढत जाऊन भविष्यामध्ये पोकलँड मशीन पूजण्याचा योग येवो, असे ग्रामदैवत श्री हनुमानाला सर्वसामान्य गोरगरीब जनतेकडून साकडे घातले जात आहे. बारामती झटका परिवार यांचेकडून स्वकर्तुत्वाने प्रगती करणाऱ्या सर्वमान्य युवानेत्यास तानाजी पालवे यांना भावी कारकिर्दी हार्दिक शुभेच्छा आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng