चंद्रपूरच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा घेणार पदभार

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी चंद्रपूरच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांची शासनाने नियुक्ती केली आहे. बुधवार दि. २६ जुलै २०२३ रोजी शासनाने तसे आदेश काढले आहेत.
स्मिता पाटील या गुरुवारी पदभार घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची बदली झाल्यानंतर तब्बल सात महिने ते पद रिक्त होते. या सात महिन्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्याकडे हा पदभार देण्यात आला होता.

स्मिता पाटील यांनी यापूर्वी गटविकास अधिकारी आंबेगाव (पुणे), गट विकास अधिकारी लोणार (बुलढाणा), त्यानंतर माळशिरस गट विकास अधिकारी या पदावर कामकाज केले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागात त्यांची प्रकल्प संचालक म्हणून बदली झाली. जिल्हा परिषदेमध्ये नऊ महिन्यानंतर लगेच प्रमोशनने चंद्रपूर गट विकास अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली. आता त्या पुन्हा सोलापूर जिल्ह्यात सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात सुमारे तीन वर्षे कामकाज करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng