चळवळीतील कार्यकर्ता ते स्वीय सहाय्यक……. राजु शेट्टी
नाशिक (बारामती झटका)
१९८० च्या दशकात नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथून जगदीश इनामदार हा बी.एस.सी मध्ये शिकणारा एक तरुण, स्वर्गीय शरद जोशी, नरेंद्र अहिरे, माधवराव खंडेराव मोरे (नाना ), भास्करराव बोरावके, या सर्वांच्या शेतकरी चळवळीतील कामाने प्रभावित झाला. आपलं बी.एस.सी चे शिक्षण अर्धवट सोडत स्वर्गिय नरेंद्र अहिरे यांच्यासोबत शेतकरी चळवळीत काम करण्यास सुरुवात केली. त्याकाळी नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटना अत्यंत प्रभावीपणे काम करत होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माधवराव खंडेराव मोरे (नाना ), नरेंद्र अहिरे, माधवराव बोरस्ते ही मंडळी ज्यावेळेस उस व कांद्यासाठी लढा उभा करत असत, त्यावेळेस तो लढा निर्णायक ठरत असे. याच कारणाने जगदीश यांनी प्रभावित होऊन शेतकरी चळवळीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
दरम्यानच्या काळात स्वर्गिय नरेंद्र अहिरे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली. गिरणाची निवडणूक शेतकरी संघटनेच्या पॅनलवरती लढवण्यात आली व मोठ्या फरकाने जिंकली. राज्यात पहिला साखर कारखाना नरेंद्र अहिरे यांच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या ताब्यात आला. त्यावेळेस जगदीश हा चुणचुणित व प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता असल्याने नरेंद्र अहिरे यांच्यासोबत स्वीय सहाय्यक म्हणून काम सुरू केले. हळूहळू त्याने शेतकरी चळवळीबरोबर नरेंद्र अहिरे यांच्यामुळे प्रशासकीय कामातही आपली चुणूक दाखवली. नरेंद्र अहिरे यांच्या जिल्हा बँक व पदवीधर निवडणुकीत जगदीशने खूप मेहनत घेतली होती. दरम्यान, नरेंद्र अहिरे यांच्या अकाली निधनानंतर जगदीश चळवळीतून थोडा बाजूला पडलेला होता.
२००४ साली राजु शेट्टी आमदार झाले. त्यानंतर अकोले, जि. अहमदनगर येथे एका व्याख्यानासाठी गेलो होतो. त्यावेळेस नुकतंच आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी चळवळीने मोठे आंदोलन उभे केले होते. त्यावेळेस त्या कार्यक्रमास मी येणार आहे, हे समजल्यानंतर जगदीश अकोले येथे पोहोचला. मी ही शेतकरी चळवळीमध्ये काम करत असताना नरेंद्र अहिरे, माधवराव खंडेराव मोरे नाना यांच्या कार्याने प्रेरित झालेलो होतो. तेव्हा जगदीश नरेंद्र अहिरे यांच्यासोबत काम करत होता, हे सांगितल्यावर मला त्याच्याबाबत चांगलीच चळवळीतील आस्था निर्माण झाली. त्यानंतर जगदीश आणि माझी चांगली ओळख निर्माण होऊन जगदीश आणि मी आमदार व खासदार असताना माझे संसदीय कामकाजाचे काम बघू लागला. जगदीश हा चळवळीतील कार्यकर्ता असल्यामुळे अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये व बैठकांमध्ये तो माझ्यासोबत असायचा. एखाद्या गोष्टीत जर एखादा निर्णय मनासारखा नाही झाला तर तो हुज्जत घालायचा. त्याचा हा स्वभाव बघून अनेकदा लोक, साहेब कोण ? आणि पीए कोण ? असा उलट प्रश्न करत असत.
२००४ पासून ते २०१९ पर्यंत विधानसभेच्या व लोकसभेच्या कामकाजामध्ये त्याने अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले. दिल्ली सारख्या ठिकाणी काम करत असताना त्याने चांगल्या पद्धतीने संसदीय कामकाज व देशपातळीवरील चळवळीमध्ये समन्वय ठेवण्याचे काम केले. चळवळीशी असलेली त्याची तळमळ यामुळे त्याने देशपातळीवरील शेतकरी चळवळीतही तितक्याच उत्साहाने काम केले. अशा या जगदीशचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे आहे. जगदीशच्या निधनाची बातमी समजताच २००४ पासून ते आज अखेरच्या अनेक घडामोडी अनेक चळवळीतील क्षण, त्याने केलेले कार्य डोळ्यासमोर उभे राहिले.
त्यांच्या कुटूंबियांच्या या दुःखात सर्व स्वाभिमानी परिवार सहभागी असून हे दुःख पेलण्याची त्यांना शक्ती मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना…! स्व.जगदीशजी इनामदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
मा.खा. राजू शेट्टी यांच्या फेसबुक पोस्ट वरुन कुबेर जाधव