चौथी पास आजोबांचा नातू दहावी सीबीएससी परीक्षेत 90% मार्क पाडतो तर दोन्ही मुलं एम एस्सी ॲग्री झाली
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील वटपळी गावचे संपतराव बाळासाहेब वगरे यांनी आपली दोन मुले ज्योतीराम आणि हनुमंत यांचे प्रतिकूल परिस्थितीत एम एस्सी ॲग्री शिक्षण पूर्ण केले. अकलूज येथील दि ग्रीन फिंगर्स स्कूलमध्ये शिकत असणाऱ्या प्रांजल हनुमंत वगरे याने केंद्रीय माध्यमिक शालांत CBSE परीक्षेत 90% मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केलेले असल्याने शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीचा प्रत्यय येत आहे.

वटपळी येथे सौ. गिरीजाबाई व श्री. संपतराव बाळासाहेब वगरे यांचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. घरची गरीब परिस्थिती असल्याने संपतराव वगरे यांना चौथीपर्यंत शिक्षण घेता आले. त्यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सुरुवातीपासून 1962 साली कारखान्यात कामाला सुरुवात केली. त्यांनी कारखान्यात चाळीस वर्ष इमाने इतबारे सेवा बजावली आहे. 40 वर्ष ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सायकलवर वटपळी ते यशवंतनगर, अकलूज असा प्रवास केलेला आहे.
सुरुवातीस दरमहा सत्तर रुपये पगारावर नोकरीस सुरुवात केलेली होती. संपतराव यांनी ठरविलेले होते की, आलेला सर्व पगार मुलांच्या शिक्षणावर खर्च करावयाचा. प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा कष्ट, जिद्द, चिकाटी या जोरावर सौ. गिरीजाबाई व श्री. संपतराव वगरे यांनी मनाशी खुणगाठ बांधलेली होती. आपण शिकलो नाही मात्र, आपली मुलं सुशिक्षित करायची, असा त्यांनी ध्यास घेतलेला होता.
ज्योतीराम आणि हनुमंत दोघांनीही गरिबीची जाणीव व आई-वडिलांचे कष्ट यामुळे कॉलेज जीवनामध्ये अभ्यासाला महत्त्व दिलं आणि दोघांनीही एम एस्सी ऍग्री शिक्षण पूर्ण केलेले आहे. सौ. गिरीजाबाई यांनी प्रपंच करीत असताना अतिशय काटकसरीपणाने केलेला आहे.
सध्या ज्योतीराम हे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील सुभाष विद्यामंडळ पिंपळवाडी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सौ. अश्विनी सौभाग्यवती लाभलेली आहे. तर हनुमंत माळशिरस पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

हनुमंत यांचा चांदापूरी ह.मु.पंढरपूरचे ज्येष्ठ नेते श्री. अरुण काळे यांची कन्या अहिल्या यांच्याशी विवाह झालेला आहे. सौ. अहिल्या आणि श्री. हनुमंत यांना प्रांजल आणि प्रणित हे चिरंजीव आहेत. हनुमंत यांनी सुद्धा ठरवलेले आहे आपला संपूर्ण पगार मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा.
मुलांकडून परिवाराच्या आयपीएस आयएसआय अधिकारी होण्याच्या अपेक्षा आहेत. त्याप्रमाणेच मुलांचे पाऊल पडत आहे. प्रांजल याने घवघवीत मिळवलेले यश आणि प्रणित सुद्धा ग्रीन फिंगर स्कूल अकलूज येथेच इ. चौथी मध्ये शिक्षण घेत आहे.


सौ. गिरजाबाई यांचे त्या काळातील प्रपंचाची हातोटी याचे सौ. अहिल्या यांनी अनुकरण करून काटकसरीने प्रपंच करत आहेत. आहे यात समाधान मानून वगरे परिवाराची मुलांच्या भवितव्यासाठी धडपड सुरू आहे. मुले सुद्धा आई-वडिलांची व आजी-आजोबांची इच्छा पूर्ण करतील, यात तिळमात्र शंका नाही.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
