खैराव-मानेगाव योजनेच्या निधीसाठी आज बुधवारी मंत्रालयात बैठक : आ. बबनदादा शिंदे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
भीमा व सीना नदीवर बॅरेजेस बांधण्याबाबत चर्चा
मानेगाव (बारामती झटका)
माढा तालुक्याच्या पूर्व भागातील सीना नदीवरील खैराव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून कार्यान्वित होणाऱ्या खैराव-मानेगाव उपसासिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे काम व भूमिगत पाईपलाईनच्या प्रत्यक्ष कामासाठी निधीच्या तरतूदीसाठी जलसंपदा विभागाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयातील दालनात बुधवार, दि.७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० वा. बैठक संपन्न झाली.
आ. शिंदे म्हणाले की, खैराव- मानेगाव उपसासिंचन योजनेस शासनाची तत्वतः अंतिम मंजुरी यापूर्वीच मिळाली आहे. परंतु, निधीची तरतूद नसल्यामुळे प्रत्यक्ष सुरुवात झाली नव्हती. या योजनेस निधी मिळावा म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी याबाबतीत धोरण अवलंबिले असून बुधवारी या योजनेचे सर्वेक्षण व निधीच्या तरतुदीसाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याच बैठकीत भीमा व सीना नदीवर ज्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. पावसाळ्यात तेथून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून वाया जाते. त्यामुळे त्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याच्या कामासंदर्भात व निधीच्या तरतुदी संदर्भातही या मीटिंगमध्ये चर्चा झाली. यावेळी आमदार संजय मामा शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव व सोलापूर जिल्ह्यातील अधिकारीही उपस्थित होते.

तालुक्याच्या पूर्व भागातील खैराव, मानेगाव, धानोरे देवी, बुद्रुकवाडी ,हटकरवाडी, कापसेवाडी व पाचफुलवाडी या भागातील सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची योजना कार्यान्वित व्हावी, याकरिता मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य रणजीतसिंह शिंदे व आमदार बबनराव शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच या योजनेस शासनाची तत्वतः अंतिम मंजुरी मागील वर्षी मिळाली होती. दरम्यान सरकार बदलले त्यामुळे या योजनेस निधीची तरतूद होण्यास विलंब झाला. परंतु, आता ही योजना मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या विशेष बैठकीत निधीची तरतूद होऊन उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होणार आहे. ही योजना भूमिकत पाईपलाईनद्वारे असल्याने या भागातील बंधारे, ओढे, नाले, पाझर तलाव व शेततळी भरून दिली जाणार आहेत. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. या भागातील नागरिक व शेतकऱ्यांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी या निमित्ताने पूर्णत्वास येणार असल्याचेही आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



