टेंभूर्णी परिसरातील बेकायदेशीर भेसळयुक्त दारु विक्री व वाहतुकीवर कारवाई करा, अमोल धुमाळ शिवसेना कार्यकर्ते
जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली मागणी
टेंभूर्णी (बारामती झटका)
टेंभुर्णी शहरात जिल्ह्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आहे. लगतच देशात एक नंबरचा साखर कारखाना आहे. त्यामुळे टेंभुर्णी परिसरात ऊसतोड कामगार, औद्योगिक कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. यामुळे या परिसरामध्ये भेसळयुक्त दारुची विक्री व बेकायदेशीर दारु विक्रेत्यांकडून वेगवेगळ्या वाहनातून खुलेआम वाहतुक मोठ्या प्रमाणात केली जात असुन यामुळे टेंभुर्णी व परिसरातील नागरीकांचे जीवन धोक्यात आले आहे. तरी सदर होत असलेली बेकायदेशीर व भेसळयुक्त दारु विक्री थांबवण्यात यावी, अशी मागणी येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते अमोल धुमाळ यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केलीआहे.
टेंभुर्णी शहरालगत असलेल्या शिराळ (टें), आढेगांव, उजनी, भिमानगर, रांझणी, चांदज, आलेगांव (बु.), रुई म्हसोबाचे, आलेगांव (खुर्द), गारअकोले, टाकळी (टें.), पिंपळनेर, वेणेगांव, आकुंभे, बेंबळे, भोसले वस्ती, उंबरे, चव्हाणवाडी, घोटी, शेवरे, मिटकलवाडी, माळेगांव या परिसरामध्ये बेकायदेशीर दारुचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जात असुन त्यामध्ये टेंभुर्णी शहरातील ४ ते ५ तरुणांचा समावेश आहे.
सदरची दारु हीराजरोसपणे मोटारसायकल,चारचाकी वाहन, याद्वारे पुरवठा केला जात आहे. अशा अवैध राजरोसपणे चालणाऱ्या व्यवसायातून मिळालेली कमाई गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांकडून केली जात असून याला वेळीच आवर घालण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे. सदरची निर्ढावलेली टोळी आमचे कोणीच वाकडे करू शकत नाही, या तोऱ्यामध्ये वागत असून पोलीस अधीक्षक सोलापूर याकडे लक्ष देतील काय ? असा सवाल सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
सदरचीबेकायदेशीर व भेसळयुक्त दारु ही मोहोळ, माळशिरस, इंदापुर या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आणून या दारुमध्ये केमिकल युक्त दारु मिश्रीत करुन ब्रँडेड दारुच्या नावाखाली टेंभुर्णीतील व ग्रामीण भागातील काही तरुण मिळून हि ग्राहकांपर्यंत पोहोच करताना दिसतात. सदरची बेकायदेशीर दारु विक्री आणि वाहतुक यामुळे शासनाचा कोटयावधीचा महसूल बुडत असुन यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर, पोलीस अधिक्षक, सोलापूर तसेच पोलीस निरीक्षक टेंभुर्णी यांना देण्यात आल्या आहेत. तरी भेसळयुक्त दारू विक्री व वितरीत करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अन्यथा लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते अमोल धुमाळ यांनी दिला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng