ठाकरे गटाला मोठा धक्का, नीलम गोऱ्हे यांच्यासह दोन पदाधिकारी शिंदे गटात
मुंबई (बारामती झटका)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ विधानपरिषद आमदार मनीषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नीलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सहभागी होणार आहेत. ही आत्ताच्या घडीची महाराष्ट्रातील सर्वात खळबळ जनक घटना आहे.
डॉ. निलम गोऱ्हे यांनी पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातील बीएएमएसची पदवी घेतली आहे. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून काही काळ सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नीलम गोऱ्हे या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे. विधान परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या प्रतोद म्हणून काम पाहिले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेतेपदही त्यांच्याकडे आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात त्यांनी काम केलं आहे. शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तसेच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या स्टार प्रचारक म्हणूनही त्या सक्रिय होत्या. 2002 ते 2008, 2008 ते 2014, 2014 ते आजपर्यंत विधान परिषद सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. 2019 मध्ये उपसभापतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र विधिमंडळात तब्बल 55 वर्षानंतर विधान परिषदेवर पहिल्या महिला उपसभापती बसण्याचा मान त्यांना मिळाला आहे. नीलम गोऱ्हे यांना 2014 च्या युती सरकारच्या काळात मंत्री पद मिळेल, अशा चर्चा होत्या. परंतु, त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. राजकारणात येण्यापूर्वी नीलम गोऱ्हे समाजकार्यात सक्रिय होत्या. त्यांनी स्त्री आधार केंद्र व क्रांतिकारी महिला संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या त्या अध्यक्षा असून त्यांचं कार्यालय आहे. अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे.
असं का घडलं ???
नागपूर अधिवेशनापासूनच याची सुरुवात झाली होती. उद्धव ठाकरे नागपुरात दाखल होताच काही आमदारांनी नीलम गोऱ्हे यांची तक्रार केली होती. नीलम गोऱ्हे या उपसभापती असूनही आपल्याला बोलू देत नाहीत. आदित्य ठाकरे यांच्या मुद्द्यावर ज्यावेळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाला घेरलं होतं, त्यावेळी उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांनी आपल्या आमदारांना बोलू द्यायला हवं होतं, असं आमदारांचं म्हणणं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हे यांना खडे बोल सुनावले होते. अशी माहितीही समोर आली होती.
त्यानंतर नीलम गोरे यांचा शिंदे गटाकडे ओढा वाढत गेला. मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमांना त्या प्रोटोकॉल म्हणून उपस्थित असायच्या. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या पुण्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज अखेर दुपारी नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच नीलम गोरेंसह ठाकरे गटातील आणखी दोन पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदे यांच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी सोपवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनीषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्ष प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng