तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव महाराष्ट्रातील पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सरकोली येथे भव्य शेतकरी मेळावा व अनेकांचा पक्षप्रवेश होणार आहे.
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य बीआरएस पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले, झेंडे लावण्यास सुरुवात झाली.
पंढरपूर (बारामती झटका)
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंगळवार दि. 27 जून 2023 रोजी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार आहेत. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य बीआरएस पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले असून वातावरण निर्मिती करण्याकरता झेंडे लावण्यात सुरुवात झाली आहे. बीआरएस चे सोलापूर जिल्हा समन्वयक माऊली जवळेकर, पंढरपूर तालुका समन्वयक रमेश पवार, मोहोळ तालुका समन्वयक रमेश भोसले, शेतकरी अण्णा पवार व इतर कार्यकर्ते झेंडे तयार करून लावण्याच्या लगबगीमध्ये आहेत.
पंढरपूर, मंगळवेढा मतदार संघातील स्व. आमदार भारत नाना भालके यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबाद येथे भेट घेतलेली होती. स्वर्गीय भारत नानांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाने अपेक्षित सहकार्य केले नाही. अडचणीत असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना बाहेर काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे वारंवार जाऊन ही फारशी दखल घेतली नसल्याची खंत भगीरथ भालके यांनी हैदराबादला जाताना सांगितलेली होती. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संपर्क कार्यालयातून भगीरथ भालके यांच्याशी पक्ष प्रवेश साधलेला असल्याने मंगळवारी सरकोली येथे शेतकरी मेळावा होणार आहे. त्यावेळेस भगीरथ भालके बीआरएस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पंढरपूर कडे लागलेले आहे. पहिल्यांदाच तेलंगणाचे मुख्यमंत्री आषाढी वारीच्या निमित्ताने पांडुरंगाचे व रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. बीआरएसचे अनेक कार्यकर्ते मेळावा व दौरा यशस्वी करण्याकरता कामाला लागलेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng