दारू दुकानाला बोगस परवाना दिल्याने ग्रामसेवक निलंबित
सोलापूर (बारामती झटका)
सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या मान्यतेविना दारू दुकानाला परस्पर मंजुरीचा ठराव दिल्याप्रकरणी ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील ग्रामसेवक संतोष पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी माजी सरपंच श्वेता राजगुरू यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
पेनुर येथील ग्रामसेवक संतोष पाटील यांनी तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मद्य विक्री दुकानाला मंजुरीचे ठराव दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्याचबरोबर ग्रामसेवक पाटील यांनी १४ वा वित्त आयोग निधीमधून नियमबाह्य रक्कम काढून खर्च केल्याचा आरोप राजगुरू यांनी केला होता. या तक्रारीवरून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांनी आपला अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला होता. त्यामध्ये पाटील पेनुर येथे कार्यरत असताना सन २०१८ ते सन २०२० या कालावधीमध्ये (हॉटेल वाईन मार्ट) मद्य विक्री दुकानासाठी चुकीची कागदपत्र दिल्याचे नमूद करण्यात आले होते. ग्रामसेवक पाटील यांना अनियमित कामकाज व आर्थिक अनियमितता व गैरशिस्तीच्या वर्तनाबद्दल निलंबित करण्यात येऊन शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्याचबरोबर मद्य परवानाच्या बाबतीत उत्पादन शुल्क विभागालाही कळवण्यात आले होते. गटविकास अधिकारांच्या अहवालावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश काढले असून त्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
अधिकारी पाठीशी घालत असल्याच्या तक्रारी
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात ग्रामपंचायत पातळीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळल्याच्या तक्रारी समोर येत आहे. दोनदिवसांपूर्वी माढा तालुक्यातील बिटरगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाने लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात एका सामाजिक कार्यकर्त्याला उपोषणाला बसावे लागले. या प्रकरणात संबंधित ग्रामसेवक ए. एस. कुंभार यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्यामुळे ग्रामस्थांना कारवाईसाठी उपोषणासारख्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे हे दुर्दैव आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I thoroughly enjoyed this article. Its clear, concise, and thought-provoking. Anyone else have thoughts? Check out my profile!