दोन मुलं आणि दोन मुली असूनही आईचा सांभाळ कोणी करेना…
पोलिसांनी दम भरतात वृद्धेला मिळाला न्याय
संग्रामनगर (बारामती झटका)
एकीकडे समाज माध्यमावर आई-वडील, संस्कार, भारतीय कुटुंब पद्धती यांच्या कौतुकाचा पूर आला असताना अकलूज येथील अपंग आईची सेवा कोण करायची, यावरून तिचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुले व दोन मुलींना पोलिसांनी सज्जड दम भरतात त्यांनी आपल्या जन्मदात्रीची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले.
अकलूज येथील एक ६५ वर्षीय वृद्ध महिला अपंग असल्याने अंथरुणावर पडून असते. दोन मुलांसाठी व तिच्या दोन सुनांसाठी ती आई किंवा सासू नसून निरुपयोगी वस्तू असल्याने सदर वृद्धेचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. सदर वृद्धेला वेळेवर औषधे दिली जात नव्हती, उलट सांभाळ कोण करणार यावरून एकमेकांकडे बोटं दाखवली जात होती. दोन लेकी व दोन मुलं असताना या माऊलीला घरातून हाकलून देण्यात आले. परंतु खचून जाईल ती आई कसली. या वृद्धेने थेट रिक्षा करून पोलीस ठाणे गाठले. येथे हजर असलेल्या महिला पोलीस वावर व पोलीस हवालदार रमेश सुरवसे यांना हकीकत सांगितली. त्यांनी देखील तातडीने पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना माहिती देत त्या वृद्धेच्या दोन मुलांना व मुलींना बोलावून घेतले. पोलिसांच्या माहितीमध्ये राहते घर आई-वडिलांच्या नावावरच असल्याचे समजले.

पोलिसांनी आईला सांभाळा अन्यथा तिच्या घरातून तुम्हालाच बाहेर काढून असा दमच भरला. तसेच कायद्याने आई-वडिलांना न सांभाळणे गुन्हा असल्याची माहिती दिली. दोन्ही सुनांना देखील याबाबत ताकीद देण्यात आली. अखेर दोन मुले व दोन मुली यांनी आईच्या सेवेचे वार व रक्कम देण्याचा निर्णय झाला. तसेच पोलीस मित्र नंदकुमार कांबळे यांनी सदर वृद्धेचा सांभाळ होतो का नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारी स्वीकारली. या घटनेमुळे वृद्धेला न्याय मिळाला असला तरी, ग्रामीण भागात देखील आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांची वृत्ती वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
