नवजात शिशुच्या पोटातून काढले दोन गर्भ
अमरावती (बारामती झटका)
नवजात बाळाच्या पोटातून चक्क दोन अर्भकसदृश्य गोळे करण्यात आले. दुर्मिळातील दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली. विशेष म्हणजे जगात अशा प्रकारच्या ३२ शस्त्रक्रिया आजवर झालेल्या आहेत. अशा प्रकारची भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे.
या शस्त्रक्रियेनंतर नवजात शिशुची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर अजून आठ ते दहा दिवस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत. तिकडे बुलढाणा येथील रुग्णालयात बाळाची आई सुद्धा सुदृढ आहे. मंगळवारी सकाळी शल्यचिकित्सक डॉ. उषा गजभिये, डॉ. नवीन चौधरी यांच्यासह अन्य डॉक्टरांच्या पथकाने जवळपास दीड तास ही जटील शस्त्रक्रिया केली. नवजात बाळाच्या आईला बुलढाण्यातच ठेवण्यात आले.
दीड तासाच्या जटील शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाच्या पोटातून अर्भकसदृश्य दोन गोळे काढण्यात आले. मानवी हाडे आणि केसांचे काही अवशेष असे त्याचे स्वरूप होते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्याला वैद्यकीय भाषेत ‘सरपेक्टेड टेराटोमा’ असे म्हटले जाते. बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातील महिलेने १ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सव्वा दोन किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. सोनोग्राफीमध्ये या बाळाच्या पोटात गोळे असल्याचे दिसून आले होते त्यानंतर त्या नवजात बाळाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.