Uncategorizedक्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आघाडीवर तर पेट्रोलियम स्पोर्ट बोर्डची ग्रँडमास्टर मेरी गोम्स द्वितीय स्थानावर

संजय घोडावत एम.पी.एल – ४८ वी राष्ट्रीय महीला अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धा

कोल्हापूर (बारामती झटका) आनिल पाटील यांजकडून

संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे चालू असलेल्या ४८ वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीनंतर द्वितीय मानांकित गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख सात गुणासह आघाडीवर आहे तर कालपर्यंत आघाडीवर असलेल्या चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स द्वितीय स्थानावर गेली आहे. आग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल, आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन (पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड), आठवी मानांकित महिला मास्टर औरंगाबादची साक्षी चितलांगे, नववी मानांकित कर्नाटकची महिला मास्टर ईशा शर्मा, अकरावी मानांकित तामिळनाडूची महिला ग्रँडमस्टर श्रीजा शेषाद्री व चाळीसावी मानांकित तामिळनाडूची सी. संयुक्ता, या सहा जणी सहा गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.

जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या या स्पर्धा दिल्लीच्या एम.पी.एल. स्पोर्ट्स फाउंडेशनने प्रायोजित केले आहेत, तर संजय घोडावत युनिव्हर्सिटी सहप्रायोजक आहे. चितळे डेअरी, जैन इरिगेशन जळगाव, एच टू इ सिस्टीम पुणे व फिरोदीया ग्रुप, अहमदनगर हे सहयोगी प्रायोजक आहेत.

स्विस लीग पद्धतीने ५ जानेवारी पर्यंत एकूण ११ फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम तीन फेऱ्या शिल्लक राहिल्या आहेत. नववी फेरी उद्या मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहे.

पहिल्या पटावरील गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख व चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स यांच्यातील चुरशीची लढत सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. दिव्याने वजीराकडील प्याद्याने सुरु केलेल्या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या मेरीने बेन्को गॅम्बिटने प्रत्युत्तर देत सुरुवातीपासूनच आक्रमक चाली करण्यास सुरुवात केली. संयमी दिव्याने अचुक चाली करत प्याद्याची बढत घेत मेरीला दडपणात आणले. डावाच्या शेवटी मेरीने हत्तीची चुकीची चाल रचल्याने त्याचा फायदा दिव्याने घेत घोडा व हत्तीचा कौशल्याने उपयोग करून घेत ५१ व्या चालीला सातव्या फेरीअखेर आघाडी घेणाऱ्या मेरीला पराभूत करत स्पर्धेत कमालीची चुरस निर्माण केली आहे.

दुसऱ्या पटावर कर्नाटकची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ईशा शर्मा व महाराष्ट्राची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर साक्षी चितलांगे यांच्यातील कारोकान डिफेन्सने रंगलेल्या लढतीत दोघींनीही डावावर वर्चस्व राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु शेवटी दोघींनी कोणताही धोका न पत्करता ३२ व्या चालीला डाव बरोबरीत सोडविला. तिसऱ्या पटावर स्पर्धेतील अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल विरुद्ध अर्जुन पुरस्कार प्राप्त गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ति कुलकर्णी यांच्यातील लढत किंग्स इंडियन डिफेन्सने झाली. डावाच्या मध्यात भक्तीने प्याद्याचे बलिदान देत धाडसी चाली रचल्या. परंतु वंतिकाने अचुक चाली करत भक्तीच्या राजावर आक्रमण करत भक्तीला बचाव करण्यास भाग पडले. अंतिम पर्वात वंतिकाची बाजू वरचढ असताना अनुभवाच्या जोरावर भक्तीने डाव बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले.

चौथ्या पटावर काळ्या मोहरा घेऊन खेळणाऱ्या तृतीय मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथनने आंध्रप्रदेशच्या फिडे मास्टर सुप्रिया पोटलुरी हिच्याशी ग्रुणफिल्ड बचाव पद्धतीचा अवलंब केला. मध्यपर्वात डावावर वर्चस्व राखणाऱ्या सौम्याने दोन उंटाच्या कल्पक चाली रचत सुप्रीताची दोन प्यादी मारण्यात यश मिळविले. त्यानंतर अनुभवी सौम्याला डाव जिंकण्यास फारसे कष्ट पडले नाहीत. शेवटी ५७ व्या चालीला सुप्रियाने शरणागती पत्करली. पाचव्या पटावर कोल्हापूरची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ऋचा पुजारीला तामिळनाडूच्या सी. संयुक्ता हिने अटीतटीची लढत दिली. क्वीन्स गॅम्बिट डीक्लाइनने झालेल्या या डावात मध्यपर्वात ऋचाने प्याद्याचे बलिदान देत संयुक्ताची वजीराकडील बाजू कमकुवत करण्यात यश मिळवले होते. परंतु संयुक्ताने उंट व हत्तीच्या आकर्षक चाली रचत ऋचाच्या राजावर प्रतिहल्ला करत डावावर वर्चस्व राखले. अखेर साडेपाच तास चाललेल्या प्रदीर्घ लढतीत संयुक्ताने ९६ व्या चालीला ऋचा वर मात केली.

जळगावच्या सानिया तडवीने आयुर्विमा महामंडळाच्या महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटेला तर जयसिंगपूरच्या तेरा वर्षाच्या दिव्या पाटीलने आयुर्विमा महामंडळाच्या अनुभवी महिला ग्रँडमास्टर किरण मोकांती ला पराभवाचा धक्का देत स्पर्धेत खळबळ उडवली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

7 Comments

Leave a Reply

Back to top button