नातेपुते येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे व भव्य दिव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन
नातेपुते येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु…
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व भव्य किर्तन महोत्सव निमित्ताने गुरूवार दि. २४ नोव्हेंबर ते बुधवार दि. ३० नोव्हेंबर पर्यंत हरिनाम सोहळ्याचे ग्रामस्थांच्या सहकार्यातून आयोजन करण्यात आलेले आहे. शंभू महादेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नातेपुते येथे ‘पवित्र ते कुळ पावन, तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती’, अशा पवित्र भूमीमध्ये “चला जाऊ स्वल्प वाटे, वाचे गाऊ विठ्ठल” या न्यायाने सप्ताहाची प्रेरणा ह.भ.प. मनोहर महाराज भगत जेष्ठ किर्तनकार नातेपुते यांच्यावतीने होणार आहे.

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सायं. ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० कीर्तन असा असणार आहे. या सप्ताहात दि. २४ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. गुरुवर्य युवकमित्र बंडातात्या कराडकर संस्थापक व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे कीर्तन होणार आहे. दि. २५ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख पंढरपूर, दि. २६ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. देवेंद्र महाराज निढळकर सिंहगड पुणे, दि. २७ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. गुरुवर्य अर्जुन महाराज लाड गुरूजी बीड, दि. २८ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. कबीर महाराज आतार खेड शिवापुर, दि. २९ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख रामायणाचार्य अमरावती, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत काल्याचे किर्तन ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख, रामायणाचार्य अमरावती यांचे होईल व कीर्तनानंतर महाप्रसाद होईल.
तरी या सर्व कार्यक्रमांस परिसरातील भाविक भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या श्रवण सुखाचा धार्मिक आनंद लुटावा, असे आवाहन अखंड हरिनाम सप्ताह समिती व समस्त ग्रामस्थ नातेपुते यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng