नाशिक ग्रामीण पोलिसांचे गुटखा विरोधी ‘अभियान – २’
अभियानांतर्गत जिल्ह्यातील सदर कारवाईदरम्यान एकूण 115 आरोपी जेरबंद
नाशिक (बारामती झटका)
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्हा अंतर्गत गुटख्याची अवैधरित्या वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुटखा विरोधी अभियान सुरू केले होते सदर अभियानादरम्यान दि. ६/६/२०२३ पासून दि. ३०/६/२०२३ रोजी गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कलम ३२८, १८८, २७२, २७३ भादवी सह कलम ३०(२) (अ) अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ प्रमाणे एकूण १०९ गुन्हे दाखल करून रुपये १,३६,०६,७८५ चा गुटखा हस्तगत करण्यात आला होता. सदर कारवाईदरम्यान एकूण ११५ आरोपींना जेरबंद करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध राज्यांमध्ये गुटखा तस्करीचे नेटवर्क चालवणारा मुख्य आरोपी राज भाटिया याला ग्रामीण पोलिसांनी जयपूर येथून तर नाशिक जिल्ह्यातील गुटखा तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या तुषार जगताप याला अटक करण्यात आली आहे.
सदर गुटखा विरोधी अभियानांतर्गत जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांवर व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात आली असून नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आता गुटखा विरोधी अभियान क्रमांक – २ राबविण्यात येणार आहे. सदरचे अभियान दि. ६/७/२०२३ पासून ते दि. ३१/७/२०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान जिल्ह्यातील ४० पोलीस ठाणे तसेच अवैध व्यवसायिकांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या बारा विशेष पथकांच्या मार्फत कारवाई करण्यात येणार आहे.
कॅन्सरसारख्या दूर्धर आजारांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गुटखा विरोधी अभियान सुरू केले असून यासाठी जिल्ह्यातील सर्व पानटपऱ्या, किरकोळ विक्रेत्यांची दुकाने यासह गुटख्यांची साठवणूक करणाऱ्या सर्व ठिकाणांची व वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहे
गुटख्याची अवैधरित्या होणारी वाहतूक व विक्री यासंबंधी नागरिकांना काही माहिती असल्यास त्यांनी नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे हेल्पलाइन क्र. ६२६२ (२५) ६३६३ यावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng