निवडणुकीपूर्वी भाजप-शिंदे गटाला धक्का देणार ? भाजपच्या माजी आमदाराने वाढले शिंदे गटाचे टेन्शन
मुंबई (बारामती झटका)
भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास मी रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, असे सांगून रायगड लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारांची कमतरता नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विनय नातू यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नातू यांच्या विधानामुळे शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाचे टेन्शन वाढविले आहे. केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुरू झालेल्या जनसंपर्क अभियानाची माहिती देण्यासाठी भाजपने (BJP) गुहागरमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
या परिषदे दरम्यान पत्रकारांनी डॉ. विनय नातू यांना रायगड लोकसभेची निवडणूक भाजपकडून कोण लढवणार? अशी विचारणा केली. त्या वेळी डॉ. नातू यांनी आपली भावना व्यक्त केली.
डॉ. नातू म्हणाले की, सध्या राजकीय वर्तुळात रायगड लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवार नाही, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा का चालली आहे, कोण करत आहे, याच्या खोलात शिरण्याची गरज नाही. मात्र, चर्चा करताना त्यांनी लक्षात घ्यावे की, भाजपकडे लोकसभा निवडणुकीसाठी पेण विधानसभेचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील, गुहागरातून माजी आमदार म्हणून मी स्वतः, पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, तर विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे असे चार सक्षम उमेदवार आहेत.
कुणाला जर वाटत असेल की, भाजपकडे उमेदवारच नाही, तर त्यात काही तथ्य नाही. पक्ष विचारपूर्वक उमेदवार देतो. ज्येष्ठत्वाचा विचार केल्यास मी चारवेळा आमदार होतो. प्रदेशस्तरावर संघटनात्मक काम करताना काही वर्ष रायगड जिल्ह्यातही काम केले आहे. त्यामुळे पक्षाने लोकसभेसाठी विचारणा केल्यास मी खासदारकीची संधी सोडणार नाही, असे डॉ. नातू यांनी सांगितले.
गुहागर विधानसभेची जागा 2024 च्या निवडणुकीत शिवसेना व भाजप युतीत भाजपला मिळेल, हे जवळपास नक्की झाले आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्या दृष्टीने भाजप कामाला लागला आहे. ही जागा भाजपला मिळाली तर येथील उमेदवार डॉ. नातूच असतील, असे मानले जात होते. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेत लोकसभेची संधी मिळाल्यास इच्छुक असल्याचे सांगून डॉ. नातूंनी धक्का दिला आहे. नातू यांच्या विधानामुळे लोकसभा नातू लढवणार असतील तर विधानसभेची जागा भाजप कोणाला देणार ? नव्या दमाचा स्थानिक चेहरा भाजप इथे शोधणार की आमदार भास्कर जाधव यांना टक्कर देण्याची क्षमता असलेला अन्य ठिकाणचा उमेदवार इथे येणार किंवा लोकसभा भाजपला आणि विधानसभा शिवसेनेला असे गणित राहील, अशा वेगवेगळ्या चर्चा भाजपच्या गोटात सुरू झाल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng