पंढरपूरच्या तहसीलदारांना स्वराज्य पक्षाच्या वतीने निवेदन
पंढरपूर (बारामती झटका)
स्वराज्य पक्षाच्या वतीने भंडीशेगाव, ता. पंढरपूर येथील ५६ शेतकऱ्यांचे ऑक्टोबर २०२२-२३ मध्ये अतिवृष्टीमुळे मकाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी अधिकारी व तलाठी यांनी पंचनामे करून त्याची यादी मंजूर करून पाठवली होती. पण, एक वर्ष झाले ६,४५,३०० रु. रक्कम अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नसल्यामुळे आज स्वराज्य पक्षाच्यावतीने तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, येत्या दहा-पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही तर, येणाऱ्या १० तारखेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत पंढरपूर येथे येणार असून त्यावेळी त्यांच्यासमोर स्वराज्य पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनामध्ये देण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार साहेब यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून चर्चा केली. येत्या शनिवारी भंडीशेगाव येथील तलाठी भाऊसाहेब यांना आदेश देऊन शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर व्हेरिफाय करून येत्या चार दिवसात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष गणेश माने, पंढरपूर युवक तालुकाध्यक्ष संग्राम जगताप, भंडीशेगावचे माजी सरपंच मधुकर गिड्डे, भंडीशेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रमेश शेगावकर, स्वराज्य पक्ष भंडीशेगाव शाखाप्रमुख विष्णू माने, माढा तालुका निमंत्रक सुनील सुर्वे, युवराज भोसले, कपिल गिड्डे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng