राम’ने उभारली मोहोळ तालुक्यात ‘एकी’ची गुढी

कित्येक वर्षानंतर विजयराज व बाळराजे एकाच व्यासपीठावर
मोहोळ (बारामती झटका सुहास घोडके यांजकडून)
राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र आणि कोण कुणाचा कधीच कायमचा वैरी नसतो, हा अलिखित नियम आहे. त्यामुळे एखाद्या निवडणुकीच्या अनुषंगाने एखादा मित्र वैरी होऊ शकतो. तर एखादा शत्रू मित्र होऊ शकतो हे आजतागायत देशाच्या, राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाने देखील पाहिले आहे. असाच योग मोहोळ तालुक्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पहावयास मिळाला असून भाजपच्या ‘राम’ ने मोहोळ तालुक्यात ‘एकी’ची गुढी उभारली असून एकमेकांचे हाडवैरी असलेले विजयराज डोंगरे व बाळराजे पाटील एकाच व्यासपीठावर अनेक वर्षानंतर तालुक्याला पहायला मिळाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याचं झालं असं की, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वेगवेगळ्या गावांचा दौरा करत आहेत. सध्या राज्यात भारतीय जनता पार्टी, अजित पवार राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे शिवसेना आणि छोट्या-मोठ्या घटक पक्षांची महायुती आहे. त्यामुळे राज्यात जे समीकरण आहे ते समीकरण प्रत्येक लोकसभा मतदारसंघात असल्यामुळे मागील कुरघोडी विसरून ‘अब की बार – ४०० पार’ चा नारा घेऊन महायुतीचे सर्व पक्ष नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हात झटकून कामाला लागले आहेत.
याच निमित्ताने मोहोळ तालुक्यात राम सातपुते यांचा दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यासाठी भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते ‘कमळ’ चिन्हाच्या प्रचारासाठी एकत्रित जमलेले पहावयास मिळाले. विशेष म्हणजे या दौऱ्याच प्रमुख आकर्षण ठरले ते विजयराज डोंगरे व बाळाराजे पाटील.
वास्तविक पाहता मुख्य राष्ट्रवादीच्या प्रवाहात काम करत असताना माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे या राम-लक्ष्मणाच्या जोडीने तालुक्यासह जिल्ह्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. वडिलांचा वसा आणि वारसा पुढे चालवत बाळराजे व विजयराज यांनी देखील हातात हात घेऊन तालुक्याचे राजकारण पाहिले. एकमेकांच्या मदतीने तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणावर देखील या दोघांनी वर्चस्व गाजविले. मात्र, पुत्र प्रेमामुळे पुढे जाऊन पाटील व डोंगरे असे दोन गट विभागले गेले. पुढे जाऊन डोंगरे गटाने भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सुमारे दहा वर्षापासून तालुक्याचे प्रमुख असणारे हे दोन युवक कधीच एका व्यासपीठावर दिसले नाहीत.
मात्र आज महायुतीचा धर्म पाळत ‘राम’ च्या विजयासाठी एकमेकांचे हाडवैरी असणारे बाळराजे पाटील व विजयराज डोंगरे एकाच व्यासपीठावर दिसले. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे भाजपा च्या ‘राम’ने मोहोळ तालुक्यात एकीची गुढी उभारली असून बाळराजे व विजयराज यांच्या पॉवरबाज ताकदीमुळे विजयाचा गुलाल महायुतीच उधळणार असल्याचे भाकीत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.
▪️ लीड देण्याची दोघांची ग्वाही
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना लीड असायचा. मात्र आता तालुक्यातील दोन दमदार युवक राम सातपुते यांच्या कमळासाठी एकत्रित आले असून तालुक्यातून सर्वाधिक लीड देऊ अशी ग्वाही देखील या निमित्ताने दोघांनी दिली आहे.
▪️ दोघांच्या एकत्रीकरणामुळे कही खुशी कही गम
खरंतर राजकारणात कोणच कुणाचा कायमचा मित्र अथवा वैरी नसतो हा राजकारणातील अलिखित नियम आहे. एकमेकांचे हाडवैरी असताना दुसऱ्या अथवा तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडतात. प्रसंगी रक्तपात होतो. मात्र असे काही प्रसंग येतात की, हाडवैरी असणाऱ्या राजकारणातील शत्रूंना देखील एकाच व्यासपीठावर यावं लागतं. त्यामुळे काही कार्यकर्त्यांना वाटतं आम्ही तुमच्यासाठी लाट्या काट्या खाल्ल्या, विरोध पत्करला, त्रास सहन केला आणि आता तुम्ही एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलात यांच्या एकत्रित बसण्याने काही कार्यकर्त्यांना ‘गम’ वाटतो. तर राजकारण हे वैचारिक विरोधाचं असावं, तात्विक असलं पाहिजे असे देखील अनेक कार्यकर्त्यांना वाटल्याने बाळराजे व विजयराज यांच्या एकत्रित येण्याने काही कार्यकर्त्यांना ‘खुशी’ वाटली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.