पठाणवस्ती गावातील बंधाऱ्यांची दुरुस्ती करा अन्यथा, आंदोलन करणार – लोकनियुक्त सरपंच एजाज पठाण.
जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रशासक असल्याने जाणीवपूर्वक डोळे झाक केली जात असल्याने डोळे उघडण्याकरता आंदोलन करावे लागेल, थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच एजाज पठाण यांचा आक्रमक पवित्रा….
माळशिरस (बारामती झटका)
पठाणवस्ती ता. माळशिरस या गावामध्ये “असून अडचण नसून खोळंबा” अशी अवस्था माळशिरस पंचायत समितीच्या अंतर्गत जलसंधारण विभागाच्या बंधार्यांची झालेली आहे. अनेक दिवसांपूर्वी केलेल्या बंधाऱ्याला गळती लागली असून पाण्याचा साठा होत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनसुद्धा पठाणवस्ती गावातील बंधाऱ्यांची दुरुस्ती होत नसल्याने थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच एजाज पठाण यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.
जिल्हा परिषद व माळशिरस पंचायत समिती दोन्हीही ठिकाणी प्रशासक आहेत. जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले आहेत. योगायोगाने भोसले यांच्याकडे माळशिरस पंचायत समितीमधील जलसंधारण विभागाचे उप अभियंता याही पदाचा पदभार होता. वेळोवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भेटून पाण्याची अडचण सांगितलेली होती. तरीसुद्धा जाणीवपूर्वक डोळे झाक केली जात असल्याने प्रशासनाचे डोळे उघडण्याकरता आंदोलन करावे लागेल, असा थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच एजाज पठाण यांनी इशारा देऊन आक्रमक पवित्रा घेतलेला आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात पाण्याची कायम अडचण असते. शेतीला व जनावरांना पिण्याचे पाणी याची अडचण होत असल्याने काही वर्षांपूर्वी गोरख रामू शेटे व अशोक धोंडीबा उरवणे व राजकुमार सदाशिव शेटे यांच्या शेताजवळ सिमेंट बंधारे बांधलेले होते. सदरचे बंधारे नादुरुस्त झालेले आहेत. बंधाऱ्याखालून पाणी वाहत जात असल्याने पाण्याचा साठा होत नाही. त्यामुळे बंधारे कोरडे पडत असतात. लोकांना पाण्याची अडचण भासत असते. यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सुद्धा बंधाऱ्यांच्या दुरुस्त्या झालेल्या नाहीत. तरी लवकरात लवकर बंधार्यांच्या दुरुस्त्या झाल्या नाहीत तर, ग्रामस्थ यांच्यासोबत आंदोलन, उपोषण करून सदरचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असा प्रशासनाला सबुरीचा इशारा दिलेला आहे. तरी लवकरात लवकर बंधारे दुरुस्त करण्यासाठी कार्यवाही व्हावी, अशी थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच एजाज पठाण यांची मागणी आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng