Uncategorized

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अश्रू पुसणार का ? बंद खोलीत काजू बदाम खात बसणार ?


अडचणीत असलेल्या शेतकरी अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान होऊन उघड्यावर पडला आहे…

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यामध्ये अचानक अवकाळी पावसाने थैमान घालून जोरदार गारपीट झालेली आहे. अडचणीत असलेला शेतकरी अवकाळी पावसाने पिकाचे व फळबागांचे प्रचंड नुकसान होऊन उघड्यावर पडलेला आहे. अशा अडचणीच्या काळात योगायोगाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी हितगुज करून झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन अश्रू पुसणार ? का बंद खोलीत काजू, बदाम खात बसणार ?, अशी चर्चा पीडित शेतकरी यांच्यामधून सुरू झालेली आहे.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शिखर शिंगणापूरच्या पायथ्यापासून गारपीट पट्टा असाच पुढे पंढरपूर तालुक्यांमध्ये गेलेला आहे. माळशिरस तालुक्यातील भांब, गिरवी, कन्हेर, मांडकी, इस्लामपूर, गोरडवाडी, जळभावी, मोटेवाडी, माळशिरस, निमगाव, मळोली, तांदुळवाडी, तोंडले, बोंडले या गावांसह अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे. त्यामध्ये वादळी वारे व गारा यामुळे शेतामध्ये उभी असणारी पिके गहू, ज्वारी, मका, हरभरा, कडवळ अशा पिकांसह द्राक्ष, केळी, डाळिंब, पेरू, चिक्कू, सीताफळ, मोसंबी, आंबा अशा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झालेली आहेत. मोठ्या शेतकऱ्यांबरोबर अल्पभूधारक शेतकऱ्यांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी उसनवारी, बँकेचे कर्ज काढून आपली पिके पोटच्या पोरासारखी सांभाळली होती. निसर्गाची अवकृपा झाली आणि बघता बघता होत्याचे नव्हते झाले. शेतकरी फक्त उभ्या पिकाचे नुकसान डोळ्याने पहात होता. कष्टाने फुलविलेली शेती निसर्गाने झोडपून काढलेली असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभा राहिलेले आहेत. शेतकऱ्यांचा संपूर्ण परिवार हवाल दिल झालेला आहे.

अडचणीच्या शेतकऱ्याला दिलासा देऊन आर्थिक मदत करण्याची गरज आहे प्रशासनाने पंचनामे करीत असताना प्रत्येकाच्या बांधावर जाऊन पंचनामे करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माळशिरस तालुक्यात महिला बचत गट मेळावा व कर्जवाटप या कार्यक्रमासाठी येत आहेत. तो सुद्धा कार्यक्रम महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कार्यक्रम संपल्यानंतर बंद खोलीमध्ये काजू बदाम खात बसण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अश्रू पुसणार का ?, असा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मधून सूर येत आहे. पालकमंत्री यांनी तालुक्यामध्ये संपूर्ण गावात न फिरता ठराविक एक दोन गावाला जरी भेटी दिल्या तरीसुद्धा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होईल.

जर पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विषयी तीव्र संतापाची लाट उसळली जाईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button