पुरोगामी विचारांच्या वसुंधरा सरनोबत–सरकार यांचे निधन
कोल्हापूर (बारामती झटका)
शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक (कै.) नारायणराव सरनोबत-सरकार यांच्या पत्नी वसुंधरा सरनोबत-सरकार (वय ९०, रा. राजारामपुरी १० वी, गल्ली) यांचे शनिवार रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. कै. बापूसाहेब नलावडे (सातारा) यांच्या त्या कन्या तर ऑलिम्पिकवीर, आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत यांच्या त्या आजी होत.
वसुंधरा सरनोबत यांच्या आयुष्यावर वडील बापूसाहेब नलावडे यांच्या पुरोगामी विचारांचा पगडा होता. त्या घरी येणाऱ्या लोकांना कर्मकांड, अनावश्यक विधी व घातक अशा रुढीपासून दूर रहा, असा सल्ला देत होत्या. त्यांनी स्वत:च्या मृत्यूसंदर्भातील विधीबाबत १९९९ सालीच एका कागदावर लिहून त्याला पाकीट बंद केले होते. हे पाकीट त्यांनी राजेंद्र व जीवन सरनोबत या आपल्या दोन मुलांकडे दिले होते. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास वसुंधरा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

पंचगंगा स्मशानभूमीकडे वसुंधरा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारास नेण्याआधी राजेंद्र व जीवन यांनी आपल्या आईने दिलेले पाकीट खोलले. या पाकिटामधील कागदावर वसुंधरा यांनी लिहिलेला मजकूर वाचून सारा सरनोबत परिवार अचंबित झाला. अंत्यसंस्कारावेळी अनावश्यक विधी न करता फक्त दहन व रक्षाविसर्जन हिंदू पद्धतीने असे या कागदावर लिहिले होते. शिवाय अंत्यसंस्काराच्या तिसऱ्या दिवसापासून सर्वांनी आपापल्या कामांना लागावे, असेही लिहिले होते. त्यानुसार सरनोबत परिवाराने रविवारी सकाळी ८ वाजता कोणतेही विधी न करता वसुंधरा यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. सोमवारी सकाळी ९ वाजता रक्षा विसर्जन आहे. ते ही कोणत्याही विधी न करता केले जाणार आहेत. तसेच दिवसकार्य न करण्याचे परिवाराने ठरवले आहे वसुंधरा यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे व परतवंडे असा परिवार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng