प्रा. लेफ्टनंट केशव पवार यांना डॉक्टरेट (पीएच. डी.) पदवी प्रदान
सायकल रिक्षा चालक, हॉटेल कामगार ते इंग्रजी साहित्याचा संशोधक प्रेरणादायी प्रवास
सातारा (बारामती झटका)
सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथील एन.सी.सी. ऑफिसर लेफ्टनंट प्रा. केशव पवार यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची इंग्रजी विषयातील डॉक्टरेट (Ph.D.) पदवी प्राप्त केली. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. लेफ्टनंट प्रा. केशव पवार यांनी ‘निवडक दलित आत्मचरित्रांमध्ये दलित अस्तित्वाचा अभ्यास’ (A Study of Dalit Identity in the Select Dalit Autobiographies) या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला होता. या विषयासाठी त्यांना कला व वाणिज्य महाविद्यालय आष्टा येथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर व प्राध्यापक स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
लेफ्टनंट प्रा. पवार हे या पूर्वी इंग्रजी विषयात तीन वेळा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेट, सेट परीक्षा पास केली आहे. तसेच त्यांना एम.फिल. पदवीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून राजीव गांधी नॅशनल फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. तसेच त्यांनी युजीसीचे दोन लघु शोध प्रबंध व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून १५ संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत. लेफ्टनंट प्रा. पवार हे शैक्षणिक व संशोधनाच्या कामासोबतच पुरोगामी चळवळीत सक्रिय काम करतात. संविधान जागृती व समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणासाठी योगदान देतात.
लेफ्टनंट प्रा. पवार यांचे प्राथमिक शिक्षण मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील दुर्गम भागातील एका छोट्याशा खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी समाज कल्याणच्या बोर्डिंगमध्ये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृहात राहून विशेष प्राविण्यासह शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लँग्वेज लिटरेचर अँड कल्चर स्टडी येथून पूर्ण केले. त्यांचा शैक्षणिक प्रवास हा संघर्षमय आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असा आहे. त्यांनी परिस्थितीशी दोन हात करीत मिळेल ती कष्टाची कामे करून शिक्षण घेतले. वेळ प्रसंगी सायकल रिक्षा चालवून व हॉटेलात काम करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्दीने परिश्रम करून यशस्वी होता येते, हे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील उच्च संशोधन पदवी प्राप्त करून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली आहे.
इंग्रजी विषयाचे प्राध्यापक तसेच ते एनसीसीचे कंपनी कमांडर म्हणून महाविद्यालयीन तरुणांना लष्करी प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी सैन्य व पोलीस दलात कार्यरत आहेत. प्राध्यापक लेफ्टनंट पवार हे शैक्षणिक व संशोधनाच्या कामासोबतच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय काम करतात. संविधान जागृती व समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणामध्ये त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. आगामी काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोफत इंग्रजी शिकविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng