फुलचंद नागटिळक (प्रती गाडगेबाबा) यांचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने गौरव
माढा (बारामती झटका)
नगर-सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील खैराव येथील प्रति गाडगेबाबा फुलचंद नागटिळक यांनी निस्वार्थी भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, दिलासा तसेच वृक्ष लागवडीसह विविध योजना राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच सामाजिक कामातील आपले योगदान महत्त्वाचे आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा “देहू ते पंढरपूर” रस्ता स्वच्छता करता करता प्रबोधनकार संत गाडगेबाबा याचे कार्य केले. ‘निर्मल वारी, हरित वारी’, या माध्यमातून ३७०० गावातून ग्राम स्वच्छता अभियान राबविले आहे. “संत चोखोबा ते संत तुकोबा” या समता वारीमध्ये २ हजार किलोमीटर संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास, लेक वाचवा, स्त्रीजन्माचे स्वागत, पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, जनजागृती या कार्याची दखल घेऊन “स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य’ च्या वतीने दिला जाणारा “मान कर्तृत्वाचा, सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देण्यात आला आहे.
सावेडी येथील माऊली संकुल येथे स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने (महाराष्ट्र राज्य) सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील खैराव येथील समाजसेवक फुलचंद जरीचंद नागटिळक यांना राज्यस्तरीय “समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सेवा संघाचे (महाराष्ट्र राज्य) संस्थापक बाबासाहेब पावसे, प्रदेशाध्यक्ष रोहीत संजय पवार, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, समाजसेवक यादवराव पावसे, राज्य संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, संघटक रविंद्र पवार, विश्वस्त सौ. सुजाता कासार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे, नगर तालुका अध्यक्ष श्रीकांत साठे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng