भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला महाविकास आघाडीच्या काँग्रेसनं हिसकावला…
रवींद्र धंगेकरांचा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय, भाजपचे हेमंत रासने पराभूत
पुणे (बारामती झटका)
महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल धक्कादायक लागलेला असून कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपच्या बालेकिल्ल्यात सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलंय. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी, मात्र ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करु शकली नाही. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे.
रासनेंसमोर धंगेकरांचं तगडं आव्हान
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी २ लाख ७५ हजार ६७९ मतदारांपैकी १ लाख ३८ हजार ०१८ मतदारांनी मतदान केलं होतं. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. धंगेकरांनी भाजपच्या रासनेंसमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले होते. मतमोजणीपूर्वीपासूनच राजकीय वर्तुळात भाजपच्या हातून पारंपारिक मतदारसंघ काँग्रेस हिसकावून घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.
सामान्यांचे नेते म्हणून रवींद्र धंगेकर यांची ओळख
रवींद्र धंगेकर मागील २५ वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागांमध्ये रवींद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामाला रवींद्र धंगेकर कायम हजर असत जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक पहावयास मिळालेली आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळणार हे सुरुवातीपासूनच ठरलं होतं. पण मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या धंगेकरांनी रासनेंना एकदाही आघाडी घेण्याची संधी दिली नाही. अखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी कसब्यात ऐतिहासिक विजय मिळवत भाजपचा पारंपारिक मतदारसंघ हिसकावला.
अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला, पण तरीही हेमंत रासनेंचा पराभूत
कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला आलं होतं. मात्र, त्याचा फारसा फायदा हेमंत रासनेंना झाल्याचं पोटनिवडणुकीत दिसलं नाही. तब्बल ३० वर्षांनी भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसनं हिसकावून घेतला आहे.
कसब्यात प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. या रोड शोनंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे धंगेकरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीनंही सर्व ताकद पणाला लावली होती. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराला हजेरी लावली होती. आदित्य ठाकरेंचा रोड शोदेखील झाला होता. दरम्यान, दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला होता. रवींद्र धंगेकर जनतेच्या हृदयात असल्याने मतदारांनी मतदानातून दाखवून दिलेले आहे. बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या होत्या मतदार संघामध्ये मतदारांच्या धंगेकर यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतलेली होती गेली अनेक वर्ष संघर्ष करून सर्वसामान्य जनतेची कामे करणाऱ्या रवींद्रजी धंगेकर यांना आमदार करून मतदारांच्या मनातील इच्छा पूर्ण करणार असल्याचे बोलले जात होते.
निवडणुकीनंतर मतदारांना आत्मविश्वास होता. मतमोजणीअगोदरच आमदार म्हणून रविंद्रजी धंगेकर यांचे फलक पुण्यात झळकत होते. पुणेरी पाटी सर्वकाही सांगून गेलेली होती. बारामती झटका न्यूज वेब पोर्टल यांनी बातमी तयार करून निश्चित विजय असल्याची खात्री मतदारांनी दिलेली होती.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng