*वाढदिवस विशेष : स्वयंभू, स्वावलंबी, स्वाभीमानी, साहसी, नेतृत्व म्हणजे गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे आधारवड युवा उद्योजक श्री. सतिशतात्या ढेकळे…

प्रतिकूल परिस्थितीत उद्योग व्यवसायाला सुरुवात करून जिद्दीच्या जोरावर यशस्वी युवा उद्योजक तात्यांना उदंड आयुष्य लाभो – प्रा. नितीन ढेकळे
माळशिरस (बारामती झटका)
नमस्कार, 10 जानेवारी 2026 युवा उद्योजक श्री. सतीश (तात्या) ढेकळे म्हणजेच आपल्या तात्या साहेबांचा अभिष्टचिंतन दिवस. खरंतर गतवर्षी किंवा गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण सर्वजण हा आठवडा तात्या साहेबांचा वाढदिवस सप्ताह म्हणून साजरा करत आलो आहोत. एकशिव, कळंबोली, बांगार्डे, पिरळे, कुरबावी, डोंबाळवाडी, शिंदेवाडी, पळसमंडळ किंवा संपूर्ण नातेपुते परिसरात प्रत्येक गावात, गावातल्या प्रत्येक कोपऱ्यात, वाड्या वस्तींवरती सतीशतात्यांचा वाढदिवस साजरा होत आला आहे. मात्र, आज तो उत्साह जल्लोष आपल्या सर्वांमध्ये नाही कारण बरोबर एक महिना झालं तात्यासाहेब आजच्या क्षणापर्यंत कोमात आहेत. एक महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्रकृती खूप चिंताजनक झाली होती, तशी ती आजही गंभीर स्वरूपाची आहे. त्यांच्यावरती पुणे येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात यशस्वी उपचार सुरू आहेत. प्रकृतीत सुधारणा होते आहे मात्र, आजच्या आपल्या सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारण्या इतपत त्यांची प्रकृती बरी नाही. म्हणून ते आजच्या दिनी आपल्यामध्ये येऊ शकणार नाहीत, आपल्याला भेटू शकणार नाहीत ही वस्तुस्थिती……..
खरंतर आजच्या दिवशी तात्यासाहेबांवरती लिहिताना किंवा त्यांच्याविषयी बोलताना वेगळीच भावना मनामध्ये आहे, वेदना रक्तबंबाळ आहेत, विचारांचा वाळवंट सुरू आहे, देवावरचा विश्वास उडेल की काय अशी एकूण परिस्थिती आहे……

घरची परिस्थिती अधिक बिकट असताना एक मुलगा आठवीतून आपलं अर्धवट शिक्षण सोडून वयाच्या पंधराव्या वर्षी घर सोडून पुण्यात जातो. आपल्या व्यसनी बापाच्या रोजच्या कटकटींना कंटाळून आता घरी परतणारच नाही असा निर्धार करून आहेया कपड्यानिशी घर सोडतो आणि पुण्यात पोहोचतो. राहायची व्यवस्था नाही, काय खायचं हे माहित नाही. पहिले 2 दिवस तर उपाशीपोटी फिरत राहिले. नंतरचे 8 दिवस तर नुसते बेकरीतले पाव फक्त खाल्ले आणि आयुष्याच्या संघर्षाचा प्रवास सुरू झाला.
काहीतरी काम केलं पाहिजे नाहीतर पुण्यात जगणं अवघड होईल म्हणून कामाची शोधा शोध सुरू केली. आणि काही दिवसानंतर काम मिळाले पेंटिंग वर्क सुरू केले. 1992 ते 95 च्या दरम्यान मिळेल तिथे मिळेल त्या हजेरीत पेंटिंग चे काम केले. गावातील मित्रांचा एक गट सोबत आला आणि कंत्राटी पद्धतीने कामे घेण्यास सुरुवात केली. पुढील 5 वर्षांमध्येच पुण्यातील व्यावसायिकता काय असते, कशा पद्धतीने कामे करणे अपेक्षित आहे, हे समजून घेऊन प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपला व्यवसाय उभा केला आणि एका यशस्वी युवा उद्योजकाची ओळख पुण्याला झाली.
2000 साली त्यांचा विवाह झाला. त्यांच्या वैवाहिक जीवनास सुरुवात झाली. काही दिवसातच साई पेंटिंगच्या माध्यमातून 200 मुलांना व त्यांच्या कुटुंबांना आता हक्काचा रोजगार निर्माण करण्यामध्ये तात्यासाहेब यशस्वी झाले. 2020-22 पर्यंत त्यांनी आपला व्यवसाय अतिशय जबाबदारीने आणि यशस्वीपणे सांभाळला. पुण्यातील अनेक नगरसेवक, महापौर व इतर व्यावसायिक व राजकीय लोकांशी त्यांचे संबंध येऊ लागले व व्यावसायिकतेतून समाजकारण आणि समाजकारणातून राजकारण याची ओढ तात्या साहेबांच्या मनामध्ये तयार झाली. त्यांचे पिंपरी चिंचवड येथील निवासस्थान गावाकडच्या लोकांसाठी जणू हक्काचे विश्रामगृह बनले. गावच्या पंचक्रोशीतील लोक पुण्याला गेल्यास तात्या साहेबांना भेटले नाहीत किंवा त्यांच्या घरी गेले नाहीत असे क्वचितच घडते. यातून तात्या साहेबांनी माणसं कमवायला सुरुवात केली आणि मातीतील नाती आभाळावरती कोरायला सुरुवात झाली.
खरंतर, राजकारण हा पिंड कधीच नव्हता. थोडक्यात, सांगायचं झालं तर माणूसच राजकारणी नव्हता आणि पुढे देखील नसणार आहे. मात्र लोकाभिमुख व्यक्ती, समाजहित जपणारा साधा माणूस आणि सर्वात महत्त्वाचं हितचिंतकाच्या गळ्यातील ताईत अशीच त्यांची ओळख निर्माण झाली. म्हणून श्री. शहाजी दादा धायगुडे (सरपंच) एकशिव यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले. यामध्ये पानंद रस्ते तयार करणे, विहिरी, बोरवेलची कामे, विविध सभा मंडपे, मोफत रुग्णांवरती उपचार, विविध क्रीडा स्पर्धा किंवा गावातील शैक्षणिक व समाज उपयोगी विविध विकास कामे त्यांनी प्रयत्नपूर्वक केली. गेल्या दोन वर्षात जवळपास 40 ते 50 लाख रुपयांची स्वखर्चातून तर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे तात्यासाहेबांनी आपल्या भागामध्ये केली.

माळशिरसच्या पूर्व भागात एक सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. श्री. रणजीतसिंह मोहिते पाटील, मा. आ. रामभाऊ सातपुते या मंडळींनी त्यांना आपल्यासोबत घेतले. खांद्याला खांदा देऊन त्यांच्यासोबत उभे राहिले. होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हक्काचे उमेदवार म्हणून ते आज आपल्यासमोर असते, मात्र आजच्या घडीला नियतीला हे मान्य नसावे. 11 डिसेंबरच्या रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 2 वेळा बंद पडलेलं हृदय सीपीआर देऊन सुरू करण्यात आले. ते आजच्या क्षणापर्यंत एक महिना झाला मृत्यूशी झुंज देत आहेत. तात्यासाहेबांनी आजवर एकशिव व एकशिव पंचक्रोशीतील जवळपास 2 ते 3 हजार युवकांचे वाढदिवस साजरे केले असतील. त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले आहेत. एकशिव गावातील शेकडो तरुणांनी तात्यांच्या यशस्वी उपचारासाठी शंभू महादेवाला रुद्र अभिषेक घातला. त्यांची प्रकृती ठणठणीत व्हावी म्हणून गावातील सर्व वडीलधारी ज्येष्ठांनी आपले योगदान दिले, आशीर्वाद दिले. खरोखरच आजच्या वाढदिवस दिनी विघ्नहर्ता गणेशाला व तुळजापूरच्या जगदंबेला मनापासून प्रार्थना करतो की सतीशतात्यांची तब्येत पूर्वीप्रमाणे ठणठणीत होऊ देत. आम्हा सर्वांचे आयुष्य तात्या साहेबांना लाभू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तात्या साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा……… धन्यवाद
प्रा.नितीन ढेकळे
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



