ताज्या बातम्यामनोरंजनसामाजिक

मधुर आवाज, अभिजात प्रतिभेची देखणी गायिका – गीता दत्त

मुंबई (बारामती झटका)

भारतीय सिनेसृष्टीत अनेक नाट्यमय घटनांचा अंतर्भाव आहे. जुन्या जमान्यात तीन दशके रसिकांच्या मनावर जादुई स्वराने अधिराज्य करणारी गीता दत्त यांच्या अल्लड आवाजाने माहोल उभा केला होता. या गायिकेने गुरुदत्त नावाच्या अभिजात अभिनेत्याशी लग्न केले. पण नंतरच्या काळात गुरुदत्तच्या खाजगी जीवनात वहिदा रहमान नावाच्या अभिनेत्रीचा शिरकाव झाला. परिणामी, गुरुदत्त व गीता दत्त या नवरा बायकोच्या नात्यात अंतर पडले. नंतर त्या उभयतांच्या खाजगी आयुष्यातील घटना खूप अडवट वळणाच्या होत्या. यात आपण डोकावण्याचे कारण नाही.

वक्त ने किया क्या हसीं सितम, तुम रहे ना तुम, हम रहे ना हम., मेरा सुंदर सपना बीत गया., तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले, एक दाव लगा ले., ठंडी हवा काली घटा, आ ही गई झूम के., रिमझिम तराने लेके आई बरसात., ना जाओ सैय्यां, छुडा के बैय्या., बाबू जी धीरे चलना., जाने कहा मेरा जिगर गया जी., मै प्रेम में सब कुछ हार गयी, बेदर्द जमाना जीत गया., मेरा नाम चिन चिन चूँ.., कैसा जादू बलम तू ने डाला.., न जाओ सैय्या.., अशी मधाळ आवाजातील गीता दत्तची गाणी रसिकांच्या हृदयात ठाण मांडून आहेत. पार्श्वगायिका गीता दत्त यांची आज ४८ वी पुण्यतिथी आहे. त्या शापित स्वरागिनी गीतादत्तची आठवण आजही अस्वस्थ करुन जाते.

सध्याच्या बांगला देशातील फरिदपूरमधील देबेंद्रनाथ घोष रॉय या जमीनदार घराण्यात जन्मलेली गीता कालांतराने आई अमियादेवी, वडील भावंडांबरोबर कोलकाता येथे आली. त्यानंतर मुंबईला येऊन स्थायिक झाली. गोरापान रंग, रेशमी काया, अर्धगोलाकार भुवया, मासोळी डोळे, उभट कपाळावर रुळणारी कुरळ्या केसांची महिरप, चाफेकळी नाक, नाजूक ओठाआड मोत्यांची सुबक दंतपंक्ती अन जोडीला मधाळ आवाज असं देखणे रुपडे गीता दत्त यांचे होते.

दादरच्या एका अपार्टमेंटच्या टेरेसवर सहज गुणगुणत असलेल्या गीता दत्तच्या आवाजाने प्रसिद्ध संगीतकार हनुमान प्रसाद भारावून गेले. त्यांनी गीताला चित्रपटांमध्ये गाण्यासाठी आग्रह केला. गीताच्या आवाजावर त्यांनी मेहनत घेतली. १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या पौराणिक चित्रपटात पार्श्वगायनाची पहिली संधी त्यांनी गीता दत्तला दिली. गीताच्या चित्रपट संगीतातील प्रवास येथूनच सुरु झाला. गीता दत्तच्या ओजस्वी अलौकिक प्रतिभा सचिनदा बर्मन यांच्यासारख्या पारखी माणसाच्या नजरेस पडली. अन गीता दत्तच्या कारकिर्दीला वळण मिळाले.

१९४७ साली दो भाई चित्रपटातील गाण्यांना दिलेल्या संगीतामुळे सचिनदा बर्मन व गीता दत्त यांची केमिस्ट्री जुळली. १९५१ मध्ये बाजी चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलेल्या तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले.. या गाण्यामुळे वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी गीता दत्त उत्तुंग लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाल्या. ओपी नय्यर यांनी संगीत दिलेली बाबूजी धीरे चलना., थंडी हवा काली घटा., जाता कहाँ है दीवाने., मेरा नाम चिन चिन चूँ., कैसा जादू बलम तू ने डाला., अशी वेगळ्या स्टाईलची गाणी गाऊन त्यांनी आपल्या जादुई आवाजाची ओळख दुनियेला करुन दिली.

बाजीमधील गाण्यांपासून गीता दत्त लोकप्रियतेच्या शिखरावर गेली होती. त्याच चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिची ओळख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या गुरुदत्त यांच्याशी झाली. गुरुदत्तने गीताला मागणी घालण्यासाठी बहीण ललिताच्या हातून सोन्याची अंगठी व पत्र पाठवले. नकार आला. पण गुरुदत्त हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. पुढे दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नंतर थाटामाटात लग्न होऊन ती गीता दत्त झाली. त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची काही वर्षे चांगली गेली. तीन अपत्ये झाली. दरम्यानच्या काळात गुरुदत्त यांच्या वैवाहिक जीवनात अभिनेत्री वहिदा रेहमानने प्रवेश केला. मग सुखी संसाराला ग्रहण लागले.

अभिनेता गुरुदत्त यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन अनंताचा प्रवास सुरु केला. गुरुदत्त गेल्याचा धक्का गीता दत्त यांना आयुष्यातून व करियरमधून उठवून गेला. तरीही तिने जमेल तितका संघर्ष केला. १९६७ मध्ये बधु भरण या बंगाली चित्रपटात तिने काम केले. १९७१ मध्ये कनू रॉय यांनी संगीत दिलेल्या अनुभव या चित्रपटासाठी गाऊन गीता दत्तने चित्रपट संगीतामध्ये पुनरागमन केले. त्या चित्रपटात गायलेले ‘मुझे जा न कहो मेरी जा.., हे गीता दत्त यांचे शेवटचं गाणे. २० जुलै १९७२ रोजी गीता दत्त यांनी एक्झिट घेतली.

मेरा सुंदर सपना बीत गया., मैं प्रेम में सब कुछ हार गई., बेदर्द जमाना जीत गया., ही गाणी तिच्या वैयक्तिक जीवनाशी मिळतीाजुळती. प्रेमाचा डाव मांडून सुखी संसाराची सुंदर स्वप्ने पाहणाऱ्या या दांपत्याचे स्वप्न अधुरे राहिले. अकाली दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या सहजीवनाची अखेर झाली. गीता दत्त म्हणजे एक न उलगडलेलं कोडे होते. तीन दशके नजाकत, मादक स्वरांच्या जोरावर गीता दत्त यांनी रसिकांच्या मनावर साम्राज्य गाजवले. राजा मेहंदी अली खान यांनी लिहीलेल्या या गाण्याने गीता दत्तला लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.

मेरा सुंदर सपना बीत गया…
मै प्रेम में सब कुछ हार गयी,
बेदर्द जमाना जीत गया..
मेरा सुंदर सपना बीत गया,
सचीनदा बर्मन एकदा म्हणाले होते, वो जब गुरुदत्तके लिये गाती है तो गलेसें नही, दिलसें गाती है!

बाजी., आरपार., प्यासा., कागज के फुल., सीआयडी., चौदहवी का चांँद., या गीतांनी गुरुदत्तच्या पदरात यश टाकले. मेरा नाम चिन चिन चू…, चिन चिन चू…, रात चांँदनी मै और तू, हॅल्लो मिस्टर हाऊ डु यु डू ?, या पद्धतीची गाणी गीता दत्त यांना प्रचंड आत्मविश्वास देऊन गेली. ओपी नय्यर यांनी खर्‍या अर्थाने गीता दत्तला ताकदीची जाणिव करुन दिली.

न जाओ सैय्या…, छुडाके बैय्या, कसम तुम्हारी मै रो पडूंगी… जाने ना दूंगी..या गाण्याने मीनाकुमारीला हिंदी सिनेसृष्टीत रसिकांच्या मनात अजरामर केले. जवळपास तीन दशके आपल्या रसिकांना वेड लावणारा हा जादुई आवाज २० जुलै १९७२रोजी आसमंतात विलीन झाला. त्या स्वरसम्राज्ञीला विनम्र अभिवादन. – समीर मणियार

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button