मरणानंतरही हाल ईथले संपत नाही, स्मशान देता का कुणी स्मशान ???
माळशिरसमधील मयताचे अकलुजला अंत्यसंस्कार….
माळशिरस (बारामती झटका)
नटसम्राटमधील नायकाची घरासाठी होत असलेली परवड व आयुष्याची दशा ‘घर देता का कोणी घर…’, या संवादातून जगासमोर आली. मात्र, माळशिरस येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी समाजबांधवांना कुणी स्मशान देता का स्मशान ?, अशी हाक देत मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी देण्यात येत आहे. राहत्या गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क दुसरं गाव शोधावं लागत आहे.
माळशिरस येथील पैलवान कुटुंबातील शारदाबाई शिवाप्पा पैलवान वय ९४ यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी माळशिरस येथे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी चक्क १५ किलोमीटर अंतर असलेल्या अकलूज शहरातील स्मशानभूमीकडे जावे लागले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची मागणी करणाऱ्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लिंगायत समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आले. यासाठी नियोजित केलेल्या जागेवर सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प बसवल्याने स्मशानभूमीसाठी जागा नाही. यापूर्वी अनेक निवडणुकामध्ये वेगवेगळ्या गट व पक्षाच्या नेत्यांनी समाजाला स्मशानभूमीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे समाज बांधवांना मृत्यूनंतरही इथे संघर्ष करावा लागत आहे.
समाजबांधवांनी यापूर्वी अनेकवेळा या बाबतीत पाठपुरावा केला आहे. मात्र, स्मशानभूमी उपलब्ध झाली नाही. यापुढील काळात मयत झाल्यास तहसील कार्यालयासमोर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, याबाबत त्यांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. – शिवदास गुजरे, नागरिक माळशिरस
समाजबांधव गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी करत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाले, यानंतर कुणाशी वाद घालत बसण्यापेक्षा आम्ही सरळ दुसऱ्या गावात जाऊन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. – सत्यशील पैलवान, माळशिरस
समाजबांधवांची स्मशानामुळे परवड होत आहे. हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला असून माळशिरस नगरपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांना येणाऱ्या अडचणी सोडवुन लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागवा. – रविराज वाणी, नागरिक, माळशिरस