Uncategorizedताज्या बातम्या

महात्मा फुलेंचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – शरदचंद्रजी पवार

विज्ञानवादी फुलेंचे विचार राष्ट्र व समाज उभारणीसाठी उपयुक्त

मुंबई (बारामती झटका)

महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांचे हे काम अतिशय चिकाटीने पुढे नेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी केले. महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दुःखाची मांडणी करणारा विचार आहे. आणि तो अधिक वृद्धिंगत केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यातील सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरदचंद्रजी पवारांच्या हस्ते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, भारतात पूर्वी समाजामध्ये अवैज्ञानिक परंपरा, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य पद्धती, ब्राह्मण्य, अमानवी व माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार देशात सुरू होते‌. यावेळी गौतम बुद्धांनी याला विरोध करून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांनी याच सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली‌. जातिभेद आणि अन्याय याची परिसीमा त्याकाळी गाठली गेली होती. अशावेळी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा असा दुहेरी भाव सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडला गेला. त्यांनी गुलामगिरी, अस्पृश्यता, स्त्रीदास्य, जनावरांच्या हत्या याला विरोध केला. व्यसनापासून दूर राहा,वे अशी शिकवण त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दिली. महात्मा फुले यांचे हे विचार पुढे छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी रुजवले. फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्याचा जिर्णोद्धार केला. तसेच त्यांच्यावर पोवाडा तयार करून सत्य जगासमोर मांडले, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

सदर कार्यक्रमाला माजी खासदार समीर भुजबळ, कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, ईश्वर बाळबुदे, मंजिरी घाडगे, सदानंद मंडलिक, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्दक, समाधान जेजुरकर, कविता कर्दक, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, डॉ. योगेश गोसावी, पूजा आहेर, आशा भंदूरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोहळ्यात या मान्यवरांचा झाला सन्मान

सत्यशोधक समाज गौरव सोहळ्यामध्ये जेष्ठ लेखक डॉ. आ. साळुंखे, संशोधक लेखक व ज्येष्ठ विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. भारत पाटणकर आणि स्व. गेल ऑन्वेट, ज्येष्ठ संशोधक विचारवंत प्रा. हरी नरके यांचा एक लाख रुपये, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तर ज्येष्ठ समाजसेविका कमलताई विचारे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव तसेच प्रज्ञावंत साहित्यिक उत्तम कांबळे हे नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू न शकल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात येणार आहे. सत्यशोधक विचाराचे काम करणारे प्रा. रघुनाथ ढोक व सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रभर एकांकिका सादर करणाऱ्या प्रा. कविता म्हेत्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button