जीवनकुमार उत्तमराव जानकर यांच्या कारच्या धडकेने पानीव येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवनकुमार उत्तमराव जानकर यांच्या चारचाकी गाडीच्या धडकेने पानीव येथील शेतकरी भजनदास तुकाराम बाबर (वय 45) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर निमगाव पाटी-खुडूस (ता. माळशिरस) येथे झाला होता.
सदरच्या अपघातात दुचाकीवरील भजनदास बाबर व त्यांची पत्नी रेश्मा भजनदास बाबर यांना जीवनकुमार जानकर यांच्या गाडीने जोरदार धडक दिली. यात भजनदास बाबर यांना डोक्याला गंभीर मार लागला होता. तसेच त्यांचा उजवा पाय पूर्णपणे निकामी झाला होता. अपघातानंतर त्यांच्यावर अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. परंतु गुरुवार, दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने बाबर कुटुंबीयांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे.
मृत्यूमुळे पानीव गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. आजच दुपारी तीन वाजता पानीव येथील वैकुंठभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा रक्षाविसर्जन दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता होणार आहे. बाबर परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्व. भजनदास यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



