माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ग्रामपंचायत प्रशासन सज्ज…
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याची सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर स्वागताची जय्यत तयारी झाली.
धर्मपुरी (बारामती झटका)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुणे, सातारा जिल्ह्यातील पायी वारीचा सोहळा संपून सोलापूर जिल्ह्यात शुक्रवार दि. 23 जून 2023 रोजी सकाळी आगमन होणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ग्रामपंचायतचे प्रशासन माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून जय्यत तयारी केलेली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अकलूज उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, अकलूज विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा प्रशासन व माळशिरस तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मपुरी ग्रामपंचायतचे प्रशासक सरवदे साहेब व ग्रामविकास अधिकारी भोसले भाऊसाहेब यांनी माऊलींच्या पालखीचे व भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
धर्मपुरी ग्रामपंचायतच्या सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर 60 बाय 30 चा भव्य मंडप शामियाना उभारलेला आहे. मंडपामध्ये बैठक व्यवस्था सुसज्ज केलेली आहे, दहा सोफासेट, चार टीपॉय, 100 खुर्च्या बसण्यासाठी आहेत. महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी कक्ष 30 बाय 20 चा उभारलेला आहे. महिलांसाठी स्तनपान गृह, महिला विश्रांती गृह, महिलांसाठी सॅनेटरी पॅड व सॅनिटरी डिस्पोजल मशीनची सुविधा उपलब्ध केलेली आहे. पाच ठिकाणी विहिरी अधिग्रहण केलेल्या असून पाणी शुद्धीकरण करून दिले जाणार आहे. घनकचरा संकलन केंद्र उभारलेले आहे. प्लास्टिक संकलनाची सहा केंद्रे उभारलेली आहेत. महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन मोफत दिले जाणार आहे व वापरलेले नॅपकिन डिस्ट्रॉय करण्यासाठी डिस्पोजल मशीन सुविधा केलेली आहे. आरोग्य विभागाचा कक्ष उभारला असून आरोग्य विभागाचे कर्मचारी प्राथमिक उपचारासाठी सज्ज आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांच्या हरितवारी संकल्पनेतून शंभर वृक्षांचे वृक्षारोपण पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने हॉटेल व दुकानांच्या बाजूला वारकरी व भाविकांसाठी विश्रांती कक्ष उभारण्याच्या सूचना केल्याप्रमाणे सर्वच हॉटेल व दुकान मालक यांनी विश्रांती कक्षाची उभारणी केलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng